आपले वय अनेकांना उघड करायचे नसते. कितीही मोठे झालो तरी आपल्याला लोकांनी तरुण समजावे यासाठी विशेषतः महिला विविध प्रयत्न करताना दिसतात. तरुण दिसतेस असे म्हटल्यावर तर त्यांना विशेष आनंद होतो. परंतु इंग्लंडमध्ये तंबाखू घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेला विक्रेत्याने वयाचा अंदाज न आल्याने ओळखपत्र मागितले आणि त्यावरुन ती खूप चिडली. सारा क्लीअर या ३९ वर्षीय महिलेसोबत ही घटना घडली. आपल्याला कधी कोणी अशाप्रकारे विचारणा करेल असे कधीच वाटले नव्हते, त्यामुळे मी ओळखपत्र जवळ ठेवले नव्हते असे त्यांनी सांगितले.

सारा तंबाखू घेण्यासाठी एका दुकानात गेल्या. त्यावेळी विक्रेत्याला त्यांचे वय कमी आहे असे वाटल्याने विक्रेत्याने सारा यांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. वयाची बंधने असलेल्या उत्पादनांसाठी २५ वयाच्या आतील व्यक्तीकडे ओळखपत्र मागितले जाते. सारा यांना अशाप्रकारे ओळखपत्राची मागणी करण्यात आल्याने त्यांना अपमानित झाल्यासारखे वाटले आणि खूप रागही आला. विक्रेत्या महिलेने मला ओळखपत्र मागितल्यावर मी ३९ वर्षांची असून मला २१ वर्षांचा मुलगाही आहे असे मी तिला सांगितल्याचे सारा म्हणाल्या.

मी याआधी बऱ्याचदा या दुकानात आली आहे. मात्र मला असा अनुभव पहिल्यांदाच आला. मला ऑफीसला जायचे असल्याने मी व्यवस्थापकाशी बोलू शकले नाही. माझे खरे वय आहे त्यापेक्षा मी कमी वयाची दिसते यात माझा काय दोष आहे. खरं तर मला आहे त्या वयापेक्षा लहान समजणं ही माझ्यासाठी एका अर्थाने पावतीच होती. अनेकांना माझे वय ३९ असेल असे वाटत नाही. माझा मुलगा हा माझा भाऊ आहे असेही बऱ्याच जणांना वाटते. माझी त्वचा आणि तरुण दिसणे याविषयी अनेकांना उत्सुकता असून ते माझ्याकडे त्याबाबत चौकशीही करतात.

ज्या दुकानात सारा क्लीअर यांना तंबाखू नाकारण्यात आली त्याच्या प्रवक्त्याने त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. तो म्हणाला की, ‘‘तुमची जी गैरसोय झाली त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मात्र वयाची अट असलेली उत्पादने अल्पवयीनांना विकता येत नसल्याने आम्हाला अशाप्रकारे कागदपत्रांची मागणी करावी लागली.