मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. आपल्याकडे असलेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकेबाहेर रांगा लावायला सुरूवात केली आहे. आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित करण्यासाठी नागरिकांना चार- पाच तास रांगेत उभा रहावे लागत आहे. एटीएम बाहेरची परिस्थिती काही वेगळी नाही. अनेक ठिकाणी एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. तर काही ठिकाणी एटीएम सुरु व्हायला बराच अवधी लागणार आहे. देशातील प्रत्येक राज्यात, गावात तिच परिस्थिती आहे. अनेक एटीएमच्या बाहेर तर ‘एटीएम बंद’ अशी पाटीच लावण्यात आली आहे. त्यामुळे मनस्ताप झालेल्या नागरिकांनी रोष व्यक्त करायला सुरूवात केली आहे. केरळमधल्या कुन्नुर जिल्ह्यातील गावक-यांनी एटीएम मशिनला फूले वाहून मृत घोषीत केल्यानंतर मोदींच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कोईम्बतूरमध्येही एटीएमवर अंत्यसंस्कार करुन निषेध नोंदविण्यात आला आहे.

कोईम्बतूरमधील महिलांनी एटीएम मशीनवर अंत्यसंस्कार करुन केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. एटीएमवर अंत्यंसंस्कार करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीपीआय महिला संघटनेने सरकारला विरोध करत एटीएमला फुले वाहिली. यापुढे जाऊन एटीएमम बंद असल्याचे दु:ख व्यक्त करण्यासाठी महिलांनी रडण्याचे नाटक देखील केले. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात लोकांचे हाल होत आहेत.

सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकासमोरील गर्दीमुळे देशभरातून ५० हून अधिक लोकांना आपला जीव देखील गमावावा लागला आहे. नोटाबंदीमुळे नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन सरकारने ठराविक पेट्रोल पंपावर नोटा बदली करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच शनिवारी फक्त जेष्ठ नागरिकांसाठी बँका खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.