सध्या सोशल नेटवर्किंगवर एका निवृत्त होणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याने तिच्या बॉसला लिहिलेल्या चिठ्ठीची प्रचंड चर्चा आहे. युनायटेड किंग्डममधील साऊथहॅम्टन येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय ज्युली कॉसिन्स या नुकत्याच निवृत्त झाल्या. मात्र आपल्या नोकरी दरम्यान त्यांना त्रास देणाऱ्या महिला बॉसकडून होणाऱ्या छळासंदर्भात त्यांनी अगदी बिनधास्तपणे आणि तितक्याच तिरकसपद्धतीने बॉसला नोकरी सोडण्याआधी लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीत भाष्य केलं आहे.

३५ वर्षांपासून एका कंपनीमध्ये काम करताना वेगवेगळ्या बँकांमध्ये सफाई कर्मचारी म्हणून भूमिका बजावणाऱ्या ज्युली यांनी एचएसबीसी बँकेतील महिला मॅनेजरला आपल्या शेवटच्या चिठ्ठीमधून शाब्दिक टोले लागवले आहेत. आपल्या बॉसकडून दिल्या जाणाऱ्या वर्तवणुकीवरुन आणि वाई वागणुकीमुळे कंटाळलेल्या ज्युली यांनी आपला सर्व संताप या काम सोडण्यापूर्वीच्या शेवटच्या चिठ्ठीत व्यक्त केलाय. तुम्ही लोकांसोबत जरा नम्रपणे वागण्याची गरज असून लोकांशी थोडं आदर देऊन बोलणं शिकलं पाहिजे, असं ज्युलीने तिच्या बॉसला या चिठ्ठीमधून सुनावलं आहे.

“मी स्वच्छेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी माझ्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी तयार करुन ठेवलीय. तुम्ही ज्यापद्धतीने कार्यालयामध्ये सर्वांसमोर माझा अपमान केला त्यानंतर मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही उगाच आक्रमक होत मला क्रूर वागणूक दिली. मात्र त्यावरुन तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे याची झलक पहायला मिळाली. माझ्या व्यक्तीमत्वावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळेच यापुढे तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की, या जगात तुम्हाला कसंही वागण्याचं स्वातंत्र्य असलं तरी नम्रपणे वागा. कारण तुम्ही सर्वजण (माझ्यासारख्या) एखाद्या क्लिनरप्रमाणेच आहात,” असं या चिठ्ठीमध्ये ज्युली यांनी म्हटलं आङे.

ही चिठ्ठी ज्युली यांनी बँकेच्या शाखेत तिच्या बॉसपर्यंत पोहचवण्यासाठी ठेवली होती. मात्र तिच्या मुलाने सोशल नेटवर्किंगवर ही चिठ्ठी शेअर केल्यानंतर त्यासंदर्भात चर्चा सुरु झाली. “या कारणामुळे मला माझी आई फार प्रिय आहे. ती ३५ वर्षांपासून बँकांमध्ये काम करत होती. मात्र नुकताच तिने राजीनाम देत तिच्या मॅनेजरसाठी ही चिठ्ठी सोडली. निवृत्तीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई,” असं त्यांच्या मुलाने ही चिठ्ठी शेअर करताना म्हटलं आहे.

सोशल नेटवर्किंगवर प्रेमळपण तितकाच टोमणा मारल्याप्रमाणे आपल्या बॉसला चांगल्या वर्तवणुकीचा संदेश देणाऱ्या ज्युली यांच कौतुक होत आहे. त्यांच्या मुलाने पोस्ट केलेला फोटो १० हजारहून अधिक जणांनी रिट्विट करुन शेअर केलाय.