जगातील शेवटच्या नर व्हाइट ऱ्हिनोचं केनियातील ओल पेजेटा वन्य अभयारण्यात निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावलेली होती. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर या शेवटच्या नर गेंड्याचा मृत्यू झाला. २००९ साली दोन माद्यांसह त्याला झेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. तो ४५ वर्षांचा होता. त्याचं नाव सूदान असं ठेवण्यात आलं होतं.

जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सूडान हा एकमेव नर होता. त्याच्या सोबत दोन माद्या केनियातील अभयारण्यात आहेत. या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले पण त्यांना फारसं यश आलं नाही. सूदानचं वय वाढलं होतं तो वृद्ध झाला होता. त्याचप्रमाणे त्याच्या पायातली ताकदही हळूहळू क्षीण होत गेली होती. आपल्या पायावर उभं राखण्यास त्याला त्रास होत होता. गेल्या २४ तासांत त्याची प्रकृती पुरती बिघडली असल्यानं त्याला उभंही राहता येत नव्हतं, अशी माहिती वनधिकाऱ्यांनी दिली.

ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या संक्षणासाठी तसेच तस्करांपासून त्याला वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. सूदानच्या मृत्यूनंतर गेंड्याच्या शिकारीच्या प्रश्नाकडे जग गांभीर्यानं बघेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. गेंड्याची शिंगासाठी मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात येत आहे. चीन, व्हिएतनाम यांसारख्या देशात शिंगाना मोठी मागणी आहे. यातून तस्कर कोट्यवधी कमावतात. माणसांची पैशांची हाव या मुक्या जनावरांच्या जीवावर उठली आहे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असंही मत प्राणीप्रेमींनी व्यक्त केलं आहे.