जगातील सर्वात वृद्ध माणूस अशी ओळख असलेल्या इंडोनेशियामधल्या सोदीमेजो यांचे वयाच्या १४६ व्या वर्षी निधन झाले. जावामधल्या सेरागेन जिल्ह्यात राहणाऱ्या सोदीमेजो यांचा जन्म १८७० मध्ये झाला. खरंतर त्यांच्या वयाबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. पण ओळखपत्रावर मात्र त्यांच्या जन्माची तारिख ३१ डिसेंबर १८७० अशी लिहिली होती. सोमवारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. आश्चर्य म्हणजे २४ वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्या अंत्यविधीची सगळी तयारी केली होती. सोदीमेजो जेव्हा १२२ वर्षांचे झाले, तेव्हा आणखी फार काळ आपण जिवंत राहू शकत नाही, असेच त्यांना वाटत होते. तेव्हा आपल्या कबरीसाठी जागाही त्यांनी तयार करून घेतली असल्याचे त्यांच्या पतवंडांनी सांगितले.

गेल्याचवर्षी त्यांनी आपला १४६ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांना १० भावंडं आणि ४ पत्नी होत्या. त्यांच्या पत्नीचे १९८८ मध्येच निधन झाले होते. तर त्यांच्या भावंडांचं आणि मुलांचंही आधीच निधन झाले आहे. सोदीमेजो आपल्या नातवंडांसोबत राहत होते. सोदीमेजो जगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती आहेत, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. गेल्या आठवड्याभरापासून ते आजारी होते. तसेच अन्न पाण्याचाही त्यांनी त्याग केला होता. सोमवारी त्यांचे राहात्या घरी निधन झाले. गेल्याच महिन्यात जगातील सगळ्यात वृद्ध महिला अशी ओळख असलेल्या एमा मोरॅनो यांचेही निधन झाले. त्या ११७ वर्षांच्या होत्या. २९ नोव्हेंबर १८९९ त्यांचा जन्म झाला. तीन शतके पाहणाऱ्या त्या जगातल्या एकमेव महिला होत्या. एमा यांच्या कुटुंबियांचे कधीच निधन झाले होते. एमा आपल्या नोकरासोबत इटलीमध्ये राहायच्या.