शिओमी नोट ४ हा फोन भारतासह जगभरात गाजत असला तरी या फोनच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. बजेटमध्ये असणारा हा फोन ५ कोटींहून जास्त विकला गेला आहे. मात्र नुकताच एका ग्राहकाच्या खिशात या फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली. त्यामुळे हा फोन धोकादायक आहे का याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. साक्षी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार आंध्रप्रदेशमधील एका व्यक्तीच्या खिशात या फोनचा स्फोट झाला. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली. तरुणाच्या मांडीजवळ जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

भावना सूर्यकिरण असे या तरुणाचे नाव असून बाईकवरुन जात असताना त्याच्या पँटच्या खिशात असलेल्या फोनचा स्फोट झाला. मात्र या फोनच्या ज्वाळा आणि त्याची उष्णता इतक्या जास्त होत्या की खिशातून फोन लगेच बाहेर काढणेही शक्य झाले नाही. ही आग इतकी जास्त होती की मांडीवर बादलीभर पाणी टाकल्यानंतरही आग शमली नव्हती.

एक्स्प्रेस समूहाच्या ‘टेकहूक’ या वेबसाईटने यासंदर्भात शिओमीशी संपर्क साधला. ग्राहकांची सुरक्षितता आमच्यासाठी जास्त महत्त्वाची असल्या कंपनीने म्हटले आहे. फोनचा अशापद्धतीने स्फोट कसा झाला याबाबतचा तपास सुरु असल्याचेही शिओमी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शिओमी रेडमी नोट ४ च्या बाबतीत असा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून मागच्या महिन्यातही अशाचप्रकारे या फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली होती.