महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, केरळ आणि गुजरातमध्येही पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकमध्ये अनेक भागांमधील रस्ते, घरे पाण्याखाली गेले आहेत. अगदी दूरदूरपर्यंत रस्ता आहे हे सांगूनही पटणार नाही इतकं पाणी अनेक ठिकाणी आहे. रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग तालुक्यामधील हिरारायणकुंपी गावातील पुलही पाण्याखाली गेला आहे. मात्र या पुलावरुन एक रुग्णवाहिकेला जावचं लागणार होते. या रुग्णवाहिकेमध्ये सहा लहान मुले आणि एका महिलेचा मृतदेह होता. येडगीर जिल्ह्यातील वाडगेरा तालुक्यातील मंचानूर गावातून आलेल्या या रुग्णवाहिकेला पुराचे पाणी वाहत असलेल्या पुलावरुन रस्ता दाखवण्याची गरज होती. त्यावेळी त्या रुग्णवाहिका चालकाच्या मदतीला धावून आला तो १२ वर्षीय मुलगा.

व्यंकटेश नावाच्या या स्थानिक मुलाने या रुग्णवाहिकेला पुलावरुन सुरक्षित बाहेर येण्यासाठी रस्ता दाखवला. व्यंकटेशने केलेल्या मदतीमुळे रुग्णावहिका सुरक्षितरित्या पुलावरुन पलिकडे आली. ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने या घटनेचा व्हिडिओ यू ट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये व्यंकटेश रुग्णवाहिकेच्या पुढे गुडघाभर पाण्यातून धावताना दिसत आहे. पाण्याखाली रस्ता आहे हे तपासूनच तो रुग्णवाहिकेला पुढे येण्याच्या सुचना करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्यंकटेशवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वत:चा जीव धोक्यात टाकून रुग्णवाहिकेला वाट दाखवणाऱ्या १२ वर्षीय व्यंकटेशला अनेकांनी शबासकी दिली आहे.