करोनाच्या संकटात अनेकांनी आपली नोकरी गमावली. कधीही न केलेलं काम करण्याची वेळ अनेकांवर आली. कोणा शिक्षकाला बिगारी कामगार म्हणून काम करावं लागलं, तर एखाद्या लहानग्याला शाळा सोडावी लागली आणि मजुरी करण्याची वेळ आली. पण, अशा सर्व संकटांवर मात करत काही जणांनी वेगळा आदर्शही घालून दिलाय. असाच एक मराठमोळा तरुण आहे अक्षय पारकर.

29 अक्षय पारकर 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये सिनियर शेफ म्हणून काम करायचा. मात्र, आता मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याकिनारी त्याने आपला बिर्याणीचा छोटा स्टॉल टाकला आहे. फेसबुक पेज @Beingmalwani ने अक्षयचा प्रवास एका पोस्टद्वारे शेअर केलाय. Taj Sats हॉटेलसारख्या 7 स्टार हॉटेल्स आणि इंटरनॅशन क्रूझवर 8 वर्ष शेफ म्हणून काम केलेल्या अक्षयला लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागली. पण हातावर हात ठेवून बसून घर चालणार नव्हतं त्यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभलेल्या अक्षयने मोठी हिंमत आणि मनातल्या जिद्दीच्या जोरावर मुंबईतील दादर परिसरात बिर्याणीचा छोटा स्टॉल सुरू केला. बिर्याणीचा स्टॉल टाकल्यानंतर सुरूवातीला त्याला काही वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले पण त्याने जिद्द न सोडता सर्व संकटांचा सामना केला आणि आज दादरच्या शिवाजी मंदिरसमोर त्याने व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीचा स्टॉल टाकून स्वतःचा छोटासा का होईना पण एक बिजनेस करत आहे.

फेसबुक पेज @Beingmalwani ने अक्षयचा प्रवास एका पोस्टद्वारे शेअर केल्यापासून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टला हजारो लाइक्स मिळाले असून युजर्स अक्षयच्या धाडसाचे कौतुक करतायेत, तर अनेकजण संधीचं सोन्यात रुपांतर कसं करायचं हे अक्षयकडे पाहून शिकावं असं म्हणत त्याला शुभेच्छा देत आहेत.