भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रेक्षपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आलं होतं. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं होतं. आता २२ जुलै रोजी ही मोहीम पार पाडण्यात येणार आहे. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ अवकाशात झेपावणार आहे. मोहिमेच्या या नव्या वेळेमुळे महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा खूश झाले आहेत.

इस्रोचे ट्विट शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले, ‘मी तिथे असेन आणि या नव्या वेळेमुळे मला माझ्या झोपेचंही त्याग करावा लागणार नाही.’ पहिल्या मोहिमेची वेळ मध्यरात्रीची होती आणि आता दुपारी ही मोहीम पार पडणार असल्याने आनंद महिंद्रा खूश झाले आहेत.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल. चांद्रयान-2 चे या आधी गेल्या सोमवारी प्रक्षेपण करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावेळी निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी इस्रोचे अभियंते व शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत होते. आता हा तांत्रिक बिघाड दूर झाल्यामुळे 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चांद्रयान -2 चे पुनर्प्रक्षेपण होणार आहे.

चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.