लग्नाची वरात म्हणजे नुसता कल्ला. आपल्या मित्राच्या किंवा मैत्रीणींच्या वरातीत दंगा घालून नाचले नाहीत तर ती वऱ्हाडी मंडळी कसली. पण राजस्थानमध्ये एक वेगळीच वरात गावकऱ्यांना पाहायला मिळाली. या वरातीत चक्क नववधूच घोड्यावर बसून लग्नमंडपात पोहोचली. आता लग्न म्हटलं की नवरी मुलगी नटूनथटून लग्नमंडपात पोहोचते पण ही वधू मात्र नवऱ्यामुलासारखी शेरवानी, फेटा बांधून घोडीवरून आली. अर्थात तिला पाहून इतरांना आश्चर्याचा धक्का बसला नसेल तर नवल.

एरव्ही नवरदेव घोडीवरून येताना अनेकांनी पाहिलं असेल पण नवऱ्यामुलीला असं लग्नमंडपात येताना पाहाण्याची गावकऱ्यांची कदाचित पहिलीच वेळ असेल. यावर ही नववधू म्हणते की तिला आणि तिच्या कुटुंबियांना समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश द्यायचा आहे. ‘मुली आणि मुलं समान आहेत त्यांना वेगळी वागणूक का म्हणून द्यावी? दोघांनाही समान संधी द्यायला हव्यात. हीच बाब मला समाजाला सांगायची आहे. नेहमी नवऱ्यामुलानेच घोडीवरून थाटामाटात का यावं? मुलीनं का नाही? असा प्रश्न ती विचारते. म्हणूनच ती आपल्या लग्नाच्या दिवशी खास नवऱ्यामुलासारखी तयार होऊन आली होती. तिची वरात नवलगढमध्ये चर्चेचा विषय ठरली.