रिलायन्स कंपनीने जारी केलेल्या जिओ योजनेला कशी टक्कर द्यावी, हा प्रश्न सध्या मोबाइल सुविधा पुरविणाऱ्या कंपन्याना सतावत आहे. जिओ सेवेला सुरुवात करुन रिलायन्सने प्रतिस्पर्ध्यांना दिलेले आवाहन पेलण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार कंपनीने नवीन योजना ग्राहकांसाठी जाहीर केली आहे.  बीएसएनलने(BSNL) शहरी आणि ग्रामीण भागातील ब्राँडबॅन्ड ग्राहकांसाठी आपली नवीन योजना जाहीर केली आहे. खासगी कंपन्या जिओला प्रतिउत्तर देण्याच्या पेचात असताना बीएसएनलने ग्राहकांसाठी नवीन योजनेतून अमर्यादित डेटा उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे.  बीएसएनलने आपल्या नवीन सुविधेच्या सुरुवातीला ३०० जीबीपेक्षा अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत किफायतशीर दरात इंटरनेट सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार,  बीएसएनएलने फक्त २४९ रुपयात ३०० जीबी डाटा देणारी नवी योजना सादर केली. २४९ रुपयात ३०० जीबी डाटा या योजनेचा फायदा ६ महिने मिळणार असून सुरुवातीच्या १ जीबीसाठी दोन एमबीपीएसचा वेग मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ‘रिलायन्स जिओ’ने त्यांची बहुप्रतिक्षित ‘४जी’ इंटरनेट सुविधा जाहीर केली होती  यासुविधेअंतर्गत पहिल्या तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड ‘४जी’ इंटरनेट आणि फोन कॉल्सची सुविधा मिळणार आहे.