करोना महामारीला सुरुवात झाल्यापासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत असून रुग्णसेवा करत आहेत. यावेळी त्यांना पायाभूत सुविधांची कमतरता, संतप्त नातेवाईक अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतकंच नाही तर काही आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नैसर्गिक संकटाशीही तोंड द्यावं लागत आहे. करोना कर्मचाऱ्यांची जिद्द दाखवणारा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लडाखमध्ये नदी पार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी चक्क जेसीबीची मदत घेतली. नदी पार करण्यासाठी कर्मचारी जेसीबीमध्ये बसलेले या फोटोत दिसत आहे. इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने त्यांनी हा मार्ग निवडला होता.
लडाखच्या खासदाराने हा फोटो शेअर केला असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. फोटो ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “आपल्या करोना योद्ध्यांना सलाम, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी करोना योद्ध्यांची टीम नदी पार करत आहे. घरीच सुरक्षित राहा आणि करोना योद्ध्यांना सहकार्य करा”.
Salute to our #CovidWarriors.
A team of #Covid warriors crossing river to render their services in rural Ladakh.
Stay Home, Stay Safe, Stay Healthy and Cooperate the Covid Warriors. pic.twitter.com/cAgYjGGkxQ
— Jamyang Tsering Namgyal (@jtnladakh) June 7, 2021
फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून करोना योद्ध्यांनी दाखवलेलं शौर्य आणि जिद्द पाहून नेटकऱ्यांनी सलाम ठोकला आहे. लडाखमध्ये आतापर्यंत १९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.