अमेरिकेमध्ये गोळीबार घडण्याच्या घटना तशा नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र येथील मिसुरी येथील सेंट लुईसमध्ये केंटुकी फ्राईड चिकन म्हणजेच केफसीच्या कर्मचाऱ्यावर अचानक गोळीबार होण्यामागील कारण फारच चक्रावून टाकणार आहे. रेस्तराँमधील चिकन पॉपकॉर्न संपल्याचं कर्मचाऱ्याने ग्राहकाला सांगितलं. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि ग्राहकाने कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा सर्व प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या चाळीशीत असलेल्या ग्राहकाने ड्राइव्ह-थ्रू सेवेअंतर्गत ऑर्डर देताना चिकन पॉपकॉर्न हवे असल्याचं सांगितलं. मात्र चिकन पॉपकॉर्न संपल्याचं कर्मचाऱ्याने काऊंटरवरुन सांगितलं. त्यानंतर संतापलेल्या ग्राहकाने स्पिकर्स बॉक्समधून या कर्मचाऱ्याला धमकावलं आणि आपल्याला चिकन पॉपकॉर्न हवेत असं सांगितलं. पुढे बाचाबाची वाढल्यानंतर या ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर ज्या ठिकाणी पैसे दिले जातात तिथून हॅण्डगन आत टाकून कर्मचाऱ्यावर रोखली.
कर्मचारी या व्यक्तीशी बोलण्यासाठी काऊंटर सोडून बाहेर आला. त्यावेळी या व्यक्तीने कर्मचाऱ्यावर गोळी चालवली. गंभीर अवस्थेत या कर्मचाऱ्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कर्मचाऱ्यावर हल्ला करणारी व्यक्ती घटनास्थलावरुन पळून गेला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.