जवळपास एका आठवड्यापर्यंत इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज (Ever Given Ship) अखेर बाहेर काढण्यात आलं. हे जहाज अडकल्याने इतर जहाजांसाठी सुएझ कालव्याचा मार्ग बंद झाला होता, त्यामुळे युरोप आणि आशियातील व्यापार जवळपास ठप्प झाला होता. आता हे जहाज पुन्हा पाण्यावर तरंगायला लागल्यानंतर याच जहाजाच्या एका नवीन व्हिडिओने नेटकऱ्यांना आकर्षित केलंय.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यानुसार महाकाय Ever Given जहाजाच्या हॉर्नला बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा ‘धूम’ची म्यूझिक देण्यात आली आहे. Evergreen कंपनीच्या Ever Given जहाजाच्या हॉर्नला ‘धूम’मधील गाण्याचं म्यूझिक दिल्याचं व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. मात्र अद्याप या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही परंतु हा व्हिडिओ खरा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण, सुएझ कालव्यात अडकलेल्या Ever Given या महाकाय मालवाहू जहाजावरील बहुतांश कर्मचारी हे भारतीयच होते. “सुएझ कालवा सोडताना धूम हॉर्न वाजवण्यात आला….१०० टक्के भारतीय कर्मचारी”, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सध्या प्रचंड शेअर होत आहे. धूम चित्रपटाचे पटकथा लेखक मयूर पुरी यांनीही हा व्हिडिओ ‘वाह!’…’धूम मचा ले’, असं म्हणत आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. शिवाय त्यांनी अभिनेता उदय चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम यांनाही टॅग केलंय.


दरम्यान, 400 मीटर लांब एव्हरग्रीन हे जहाज मंगळवारी जोरदार वाऱ्यामुळे तिरकं होऊन सुएझ कालव्यात अडकलं होतं. हे जहाज अडकल्यामुळे अनेक छोट्या जहाजांचे मार्ग बंद झाले. परिणामी युरोप आणि आशियामधील व्यापार अक्षरश: ठप्प झाला होता.