प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे प्रत्येक टि्वट हे चर्चेचा विषय असते. कारण त्यामध्ये एक संदेश दडलेला असतो. आनंद महिंद्रा यांनी आता त्यांच्या टि्वटर हँडलवरुन एक कबड्डीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. छोटया, छोटया अपयशांनी खचून जाणाऱ्यांसाठी या व्हिडीओमधून शिकण्यासारखे भरपूर काही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या कबड्डी सामन्याच्या या व्हिडीओमध्ये चढाईपटू प्रतिस्पर्धी संघातील बचावफळीतील एका खेळाडूला बाद करतो. त्यानंतर चढाईपटू लगेच आपल्या क्षेत्रात निघून जाण्याऐवजी मध्यरेषेच्या जवळ उभा राहतो. त्यावेळी बाद झालेला खेळाडू चालत चढाईपटूच्या दिशेने जातो. खरंतर चढाईपटूची बाजू वरचढ असते. बाद झालेल्या खेळाडूला फारशी संधी नसते. पण बाद झालेला खेळाडू चढाईपटूला आत खेचताच बचावफळीतील अन्य कबडीपट्टू चढाईपटूची कोंडी करुन त्याला बाद करतात. काही क्षणांपूर्वी अशक्य वाटणारी एक गोष्ट शक्य होते. हाच या व्हिडीओ मागचा खरा अर्थ आहे.

“कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. कारण अपयशाला सुद्धा यशामध्ये बदलता येते. प्रो कबड्डी लीगमध्ये असे स्टंट फारसे पाहायला मिळालेले नाहीत” असे आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या टि्वटच्या संदेशामध्ये म्हटले आहे.

दरम्यान आनंद महिंद्रा यांनी स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी घरातून पळालेल्या एका गर्भश्रीमंत मुलाला इंटर्नशीपची ऑफर दिली आहे. द्वारकेश ठक्कर असं त्या मुलाचं नाव आहे. द्वारकेशच्या वडिलांचा लक्षावधींचा तेल व्यापार आहे. मात्र हा व्यापार सोडून तो एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत होता.

शिमलामधील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करून तो रात्री एका दगडावर झोपत होता. द्वारकेशसंदर्भातील एका वेबसाइटवरील बातमी शेअर करत आनंद महिंद्रांनी त्याला इंटर्नशीप देऊ केली आहे. “या मुलाचं मी कौतुक करतो. तो मेहनत करुन पुढे जाऊ इच्छितो. त्या विचारातून आता जरी त्याने घर सोडलं असलं तरी तो भविष्यात एक यशस्वी व आत्मनिर्भर उद्योगपती होऊ शकतो. मी माझ्या महिंद्रा राइज कंपनीत त्याला इंटर्नशीप देऊ इच्छितो”, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even in an adverse situation one shouldnt give up anand mahindra tweet video dmp
First published on: 15-11-2019 at 20:28 IST