महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू आणि इतर राज्यांमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा ईशान्येकडे सरकल्याने गुजरातमधील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यातही सौराष्ट्र आणि कच्छला शनिवार रविवारपासून जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. याच दरम्यान याच भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलिस हवालदार दोन चिमुकल्या मुलींना आपल्या खांद्यावर घेऊन पाण्यातून चालताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या हवालदाराच्या धैर्याला आणि कामगिरीला सलाम केला आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील महापुरात मोरबी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओत दिसणारे पोलीस हवालदाराचे नाव पृथ्वीराज जडेजा असल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातमध्येही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पुरामुळे मोरबा परिसरामध्ये कंबरेपर्यंत पाणी साचले. या पुराच्या पाण्यात कल्याणपूर येथील शाळेतील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. या शाळेमध्ये ४३ विद्यार्थी अडकल्याने शाळा प्रशासनाने एनडीआरएफलाही मदतीसाठी कळवले होते. मात्र पावसाचा जोर खूप असल्याने एनडीआरएफच्या तुकड्यांना तेथे पोहचण्यास उशीर होणार होता. एनडीआरएफआधी स्थानिक पोलिसांची तुकडी या ठिकाणी पोहचली. पाणी अधिक वाढण्याआधीच एक एक करत या मुलींना पूराच्या पाण्यातून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे ठरले. त्यावेळेस मुलींना पुराच्या पाण्यातून घेऊन जाणे शक्य नसल्याचे पोलिसांच्या तुकडीचा भाग असणाऱ्या पृथ्वीराज जडेजा यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या दोन्ही मुलींना आपल्या खांद्यावर बसवले आणि ते पुराच्या पाण्यातून चालू लागले. कंबरेएवढ्या पाण्यामधून खालील रस्ता दिसत नसतानाही पृथ्वीराज चालत असल्याचे व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चरही बाजूंने पुराचं पाणी असताना स्वत:चा जीव धोक्यात टाकत पृथ्वीराज यांनी या मुलींना खांद्यावर घेऊन चक्क दीड किलोमीटरची पायपीट करत त्यांना पुरातून सुखरूप बाहेर काढलं. गुजरात पोलिसांनीच हा व्हिडिओ ट्विट करत पृथ्वीराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

अनेकांनी ट्विटवरुन या अशा पोलिसांमुळे खाकी वर्दीचा सन्मान वाढतो, देवमाणूस, खरा हिरो अशा कमेंट करत पृथ्वीराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे.