विमानतळावर डुलकी लागल्यामुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) एका 53 वर्षीय भारतीय व्यक्तीचं भारताकडे येणार विशेष विमान सुटल्याचं समोर आलं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे.

‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, अबूधाबीमध्ये स्टोरकीपर म्हणून काम करणारे पी. शाजहां (P Shajahan)यांना एमिरेट्स जंबो जेटने तिरूवनंतपुरमला यायचं होतं. 1100 दिरहम (300 डॉलर) खर्च करुन त्यांनी भारतात परतण्यासाठी विशेष विमानाचं तिकीट काढलं होतं. या विशेष विमानाची व्यवस्था केरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्र (केएमसीसी) दुबईने केली होती. 427 भारतीयांना घेऊन या विशेष विमानाने उड्डाण घेतलं, पण शाजहां या विमानातून प्रवास करु शकले नाहीत. कारण त्यावेळी त्यांना विमानतळावर झोप लागली होती. तिकीट कन्फर्म होण्याच्या प्रतीक्षेत रात्री झोप लागली नव्हती, असं त्यांनी सांगितलं. “सकाळी विमानतळावर चेक-इन आणि अन्य प्रक्रिया झाल्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी जवळपास दोन वाजता टर्मिनल तीनच्या वेटींग एरियात पोहोचलो. इतरांपेक्षा थोडा दूर बसलो होतो. पण साडेचारच्या नंतर मला झोप लागली”, असे शाजहां यांनी सांगितले.

“आता, शाजहां यांना दुसऱ्या विशेष विमानाने सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्हिसा रद्द झाल्यामुळे ते विमानतळा बाहेरही येऊ शकत नाहीयेत आम्ही त्यांच्यासाठी काही पैशांची व जेवणाची व्यवस्था करत आहोत”, असे विशेष चार्टर्ड विमानाचे आयोजक एस. निजामुद्दीन कोल्लम यांनी सांगितले. विशेष म्हणजे याच टर्मिनलवर मार्च महिन्यातही एका भारतीय नागरिकाचं विमान झोप लागल्यामुळे सुटलं होतं. ते विमान करोना व्हायरस महामारीमुळे विमान सेवा रद्द होण्याआधीचं तिथून भारतासाठी सुटणारं अखेरचं विमान होतं.