उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने पत्नी आणि सासरवाडीच्या लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताला पाकिस्तानने पराभूत केल्यानंतर पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी जल्लोष केल्याने दुखावलेल्या या व्यक्तीने थेट पोलीस स्थानकामध्ये जाऊन एफआयआर दाखल केल्याचं टाइम्स न्यूज नेटवर्कनं म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव इशान मिया असं असून तो रामपूरच्या अझीम नगरचा रहिवाशी आहे.

इशानने केलेल्या तक्रारीनुसार त्याची पत्नी रबीना शमाई आणि तिच्या कुटुंबियांनी पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडून आनंद साजरा केला. तसेच त्यांनी पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध जिंकल्यानंतर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं असा उल्लेखही इशानने तक्रारीत केलाय.

“भारतीय संघाची खिल्ली उडवल्याप्रकरणी तक्रारदाराने पोलीस स्थानकामध्ये येऊन लेखी तक्रार करण्याची मागणी केल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल करुन घेतलीय,” असं पोलीस निरीक्षक अंकित मित्तल यांनी म्हटलं आहे. रामपूर जिल्ह्यामधील गंज पोलीस स्थानकामध्ये ही तक्रार दाखल करुन घेण्यात आलीय. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करुन घेण्यात आली असून व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून भारतीय संघाची बदनामी करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटल्याने हे कलम लावण्यात आलं आहे.

२४ ऑक्टोबर रोजी टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारतावर मोठा विजय मिळवला होता. १० गडी राखून पाकिस्तानने भारताला पराभूत करत मोठा धक्का दिला होता. भारत पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाला. पाकिस्तानच्या या विजयानंतर काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्याची प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये समोर आली. या प्रकरणामध्ये काही विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आलीय.