दुचाकी किंवा अगदी चारचाकी रस्त्यात बंद पडली तर ती काही लोकांनी मिळून ढकलल्याचे आपण पाहिले आहे. अगदी वेळच आली तर वाटेत बंद पडलेली बसही ढकलावी लागू शकते. पण विमानही ढकलावे लागू शकते याची आपण कल्पना तरी केलीय का? पण हे खरे आहे. नुकताच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये मोठ्या आकाराचे एक विमान काही लोक मिळून ढकलत असल्याचे दिसत आहे. आता विमानाचा आकार इतका मोठा असतो, ते कसे ढकलणार असे आपल्याला साहजिकच वाटले असेल. पण इंडोनेशियामध्ये घडलेल्या एका घटनेत विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी विमान ढकलत नेल्याचे दृश्य नुकतेच कॅमेरात कैद झाले आहे. त्यामुळे या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

गरुडा इंडोनेशिया एअरक्राफ्टचे विमान तंबोलका विमानतळावर अशा पद्धतीने ढकलण्यात आले. साधारण ३५ हजार किलोंचे हे विमान विमानतळावरील कर्मचारी आणि तंत्रज्ञ अशा २० जणांनी मिळून ढकलत योग्य ठिकाणी आणले. विमान ढकलतानाचा या लोकांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने कंपनीचे जनसंपर्क अधिकाऱ्यांने याबाबतचे स्पष्टीकरण दिले. इक्शान रोशन याबाबत म्हणाले, पायलटच्या चुकीमुळे विमान अशापद्धतीने योग्य जागेवर आणावे लागले. विमान लँड झाल्यानंतर ते डावीकडे पार्किंगमध्ये वळणे अपेक्षित होते. मात्र ते काहीसे उजव्या दिशेने गेल्याने कर्मचाऱ्यांना त्याची दिशा बदलण्यासाठी ते थोडे ढकलावे लागले. विमान ढकलण्यासाठी वापरला जाणारा पुशबॅक यावेळी उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना स्वत:लाच हे काम करण्याची वेळ आली. आणि त्याचेच हे चित्र असल्याचेही त्यांनी मान्य केले.