Nostradamus Predictions 2024: फ्रेंच ज्योतिषी मिशेल डी नॉस्ट्राडेम उर्फ नॉस्ट्रॅडॅमस यांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी त्यांचे पुस्तक लेस प्रोफेटीज प्रकाशित केले. या पुस्तकात भविष्याचे वेध घेणारे तब्बल ९४२ अंदाज वर्तवण्यात आले होते. जॉन एफ केनेडी यांची हत्या, ९/११ चे दहशतवादी हल्ले आणि अगदी करोना व्हायरस साथीच्या रोगाची सुरुवात याबाबतही त्यांनी पुस्तकात अंदाज वर्तवले होते असे म्हटले जाते.
२०२३ साठी, त्यांनी जगभरात आर्थिक आपत्तीची भविष्यवाणी केली होते. शेतात तण इतके वाढेल की माणूस माणसाला खायला कमी करणार नाही असे त्याने एका भागात लिहिले होते. यातील अतिशयोक्ती वगळल्यास कोविड-19 नंतरच्या आर्थिक मंदीमुळे आणि जगण्याच्या वाढत्या खर्चामुळे अनेक देशांमध्ये हीच स्थिती उद्भवली होती. तर याच पुस्तकात, नॉस्ट्रॅडॅमसने २०२२ मध्ये राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती.
अनेक अहवालांनुसार, नॉस्ट्रॅडॅमस यांच्या ७० टक्क्यांहून अधिक भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. अंदाज म्हणून 2024 साठी नॉस्ट्रॅडॅमसची काही भाकिते काय सांगतात पाहूया..
हवामानाचे संकट
फ्रेंच ज्योतिषाने २०२४ मध्ये जगभरात हवामान त्रासदायक होईल असे भाकीत केले आहे. “कोरडी पृथ्वी अधिक कोरडी होईल, आणि काही भागात मोठा पूर येईल”, असे त्यांनी नमूद केले आहे तर “कीटकांमुळे मोठा दुष्काळ” होईल असेही त्यांनी म्हटले आहे. असे झाल्यास संपूर्ण जगावर उपासमारीची वेळ येऊन हाहाकार होऊ शकतो.
राजेशाही गदारोळ
नॉस्ट्राडेमसने ‘बेटांचा राजा’ म्हणून निनावी उल्लेख केला आहे. या राजाचा वादग्रस्त घटस्फोट झाला होता आणि त्याचे बळ कमी झाले होते आणि आता याच राजाची जागा अशी एखादी व्यक्ती घेईल जिचा राजघराण्याशी काहीही संबंध नाही.
विश्लेषक आणि लेखक, मारियो रीडिंग, ज्यांनी पुस्तक- द नॉस्ट्रॅडॅमस प्रोफेसीजचे बद्दल विश्लेषण केले आहे त्यांनी सांगितले की, ‘बेटांचा राजा’ सह, नॉस्ट्राडेमस कदाचित राजा चार्ल्स तिसरा बाबत वक्तव्य करत असावा. “स्वतःवर आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे” त्याला पदत्याग करण्यास भाग पाडले जाऊ शकते असा अंदाज आहे.
नवीन तरुण पोप
सध्याचे पोप, पोप फ्रान्सिस हे ८६ वर्षीय असून वयानुरूप त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. नॉस्ट्राडेमसने आपल्या एका भविष्यवाणीत म्हटले आहे की, वृद्धत्वामुळे पोपच्या जागी नवीन तरुण पोप येईल. तरुण, जोमदार पोपचे आगमन ही चांगली गोष्ट वाटत असतानाच, नॉस्ट्रॅडॅमस लगेच म्हणतो की या नव्या उमेदवाराचे दृष्टिकोन काहीसे कमकुवत असू शकतात मात्र तो बरेच वर्ष पोप म्हणून काम करू शकतो.
याशिवाय नॉस्ट्राडेमसने चीनमुळे जगातील संघर्ष वाढण्याबात सुद्धा भाकीत केले आहे. २०२४ मध्ये यातील कोणतीही भविष्यवाणी खरी झाल्यास याचे पडसाद सर्वच देशातील मानवी जीवनावर उमटतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)