पाच वर्षांच्या मुलानं प्रदर्शनासाठी ठेवलेला काचेचा पुतळा पाडला, त्यामुळे या मुलाच्या पालकांकडून कलाकारानं चक्क ९० लाखांहून अधिक रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे या मुलानं माझ्या कलाकृतीची नासधूस केली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कलाकारानं केली आहे.

अमेरिकेतील एका कम्युनिटी सेंटरमध्ये हा पुतळा ठेवण्यात आला होता. मात्र मुलाच्या पालकांनी कलाकार बिल लेऑन्स यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. हा पुतळा काचेचा होता, त्यामुळे प्रदर्शनासाठी ठेवताना तो सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्यांची होती असं मुलाच्या आईनं म्हटलं आहे.

या लहान मुलानं खेळता खेळता या पुतळ्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत काचेचा पुतळा खाली पडला. त्यामुळे पुतळ्याचं मोठं नुकसान झालं. सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झालं आहे. कलाकार बिल यानं पालकांना पत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. बिलला ही कलाकृती तयार करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. यासाठी मी जितकी मेहनत घेतली आहे त्याच मुल्याइतकी नुकसान भरापई मी मागत आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे कलाकृतीचं फार नुकसान झालं आहे, असं बिलनं पत्रात म्हटलं आहे. पण तो लहान आहे. त्याच्याकडून अनावधानानं ही चूक झाली आहे त्यामुळे नुकसान भरपाई देता येणार नसल्याचं पालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.