कॅलिफोर्नियातील कोस्टा मेसा या शहरात रविवारी एक थरारक प्रसंग घडला. एका इंजिनाचे विमान फेल झाल्याने वैमानिकाने येथील एका महामार्गावर विमान उतरवले. रविवारी संध्याकाळी हा प्रसंग घडला. त्यावेळी जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे वैमानिकाला नजीकचे विमानतळ गाठणे शक्य झाले नाही.

या विमानाच्या वैमानिकाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याचा मित्र सॅन दिएगो येथून व्हॅन न्यूयास येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या विमानाचे इंजिन अचानकपणे फेल झाले. यावेळी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता त्यांना काही करून विमान जॉन वेन विमानतळापर्यंत आणावे लागेल किंवा समुद्रकिनाऱ्यावर लँडिंग करावे लागेल, असे सांगण्यात आले.

मात्र, जोरदार वारे वाहत असल्यामुळे विमान जॉन वेन विमानतळापर्यंत उडवत नेणे शक्य नव्हते. तेव्हा या विमानाचा वैमानिक इझी स्लॉड याने कोस्टा मेसामधील महामार्ग क्रमांक ५५ च्या उड्डाणपुलावर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. मला त्याठिकाणी मोकळी जागा दिसली आणि विमान लँड करायचे ठरवले. मात्र, विमान लँड करण्यासाठी आमच्याकडे खूप कमी वेळ होता. मात्र, आमच्याकडे वेळ खूप कमी होता. याशिवाय, हवेचा वेगही खूप जास्त असल्यामुळे शेवटी मी विमान उड्डाणपुलाच्या खालच्या रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला, असे इझी स्लॉड याने सांगितले.

कोस्टा मेसाच्या अग्निशामन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँड करतेवेळी सुदैवाना रस्त्यांवर गाड्यांची जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे याठिकाणी विमान लँड करणे एकप्रकारचा चमत्कार म्हणायला हवा. वैमानिक खूपच अनुभवी असल्यामुळे हे शक्य झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.