scorecardresearch

‘पुष्पा.. पुष्पाराज.. एकटाच बसं समद्यांना..’; अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’चा मराठी ट्रेलर पाहिलात का?

‘ए बेटा ये मेरा अड्डा’ गाण्यामध्ये व्हेरिएशन आणत, “ए बिट्टा हा आहे आमचा अड्डा… मी आहे लयी येडा” असे शब्द वापरण्यात आलेत.

Pushpa Marathi
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे (फोटो युट्यूबवरुन साभार)

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. अल्लू अर्जुनने साकारलेली चंदनतस्कर पुष्पाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं सोशल मीडियावरुन दिसून येत आहे. पुष्पा या पत्राच्या काही खास शैली सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. यामध्ये खांदा वाकून चालणे, पाय घसरत घसरत केलेला डान्स, दाढीवरुन हात फिरवत केलेली डायॉगबाजी, बिडी पकडण्याची स्टाइल, गॉगल उतरवण्याची स्टाइल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये पुष्पा अनेक ठिकाणी मराठी शब्द वापरतानाही दिसतोय. पुष्पामधील हे मराठीही अनेकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता सोशल मीडियावर आपल्या भन्नाट क्रिएटीव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘खास रे’ पुष्पाचा मराठी ट्रेलर आपल्या युट्यूब चॅनेलवरुन शेअर केलाय.

हिंदी, इंग्रजी गाण्यांच्या चालीवर भन्नाट मराठी गाणी तयार करणाऱ्या टीमने अल्लू अर्जुनच्या या धमाकेदार अॅक्शन मुव्हीला मराठीचा झणझणीत तडका दिलाय. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधील काही दृष्य वापरुन त्यावर मराठी संवाद डब करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आलाय. ‘जर तुमच्या हातात बंदुकी हायत तर आमच्या हातात बी कुऱ्हाडी हायत. वेळ आल्यावर गुच्चा बसणारच,’ या संवादापासून या मराठमोळ्या ट्रेलरला सुरुवात होते. यानंतर चित्रपटामध्ये दाढी खालून हात फिरवून ‘झुकेगां नही मैं’ म्हणणाऱ्या डायलॉगमध्येही मराठमोळं व्हेरिएशन आणलं आहे. ‘पुष्पा पुष्पाराज एकटाच बसं समद्यांना…’ म्हणत अल्लू अर्जुन दाढीवरुन हात फिरवताना दिसतोय.

त्याचप्रमाणे “पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या…” हा डायलॉग मराठीमध्ये, “पुष्पा नाव ऐकून गुलाबाचं फुलं वाटलो काय? बॉमय मी,” असा करण्यात आलाय. तसेच ‘ए बेटा ये मेरा अड्डा’ गाण्यामध्ये व्हेरिएशन आणत, “ए बिट्टा हा आहे आमचा अड्डा… मी आहे लयी येडा” असे शब्द वापरण्यात आलेत.

हा व्हिडीओ काल म्हणजेच बुधवारी १९ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला असून काही तासांमध्ये त्याला २० हजारांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्समध्ये अनेकांना हा मराठी प्रयोग आवडल्याचं दिसत असून संपूर्ण चित्रपट मराठीमध्ये तुम्हीच डब करा असा सल्लाही काहींनी कमेंट्समध्ये दिलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pushpa allu arjun movie trailer in marathi scsg

ताज्या बातम्या