अथांग समुद्रात विहार करणाऱ्या ‘हम्पबॅक व्हेल’ या महाकाय माशाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्कुबाडायव्हर असणाऱ्या क्रिग केपहार्ट याने दक्षिण आफ्रिकेच्या ईशान्य समुद्रात शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये ४० टनचा (जवळजवळ ३६ हजार ३०० किलो वजनाचा) हम्पबॅक व्हेल पाण्याबाहेर उसळी मारताना दिसत आहे.

सामान्यपणे मोठ्या आकाराचे व्हेल मासे हे केवळ श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतात आणि पुन्हा पाण्यात जातात. कधी कधी हे मासे जवळच्या माशांशी संपर्क साधण्यासाठी पाण्याबाहेर येऊन पाणी उडवतात असं संशोधक सांगतात. अनेकदा समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी येणारे मोठ्या आकाराचे व्हेल माशांचे ४० टक्के शरीर हे पाण्याच्या पातळीशी समांतर असते. मात्र आकारमानामुळे शक्यतो हे मासे डॉल्फीन माशांप्रमाणे पाण्याबाहेर उसळी मारत नाहीत. मात्र क्रिगला हे पाहता आले. त्याने हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. “डॉल्फीन अगदी ग्रेट व्हाइट शार्कही अनेकदा पाण्याबाहेर उसळी घेताना दिसले आहेत. मात्र पहिल्यांदाच एक हम्पबॅक व्हेल पाण्याबाहेर उसळी घेताना दिसत आहे,” असं क्रिगने ही पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे.

हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल नेटवर्किंगवर पुन्हा अचानक व्हायरल झाला आहे. दोन वर्षापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ युट्यूबवर एक कोटी ३३ लाखहून अधिक जणांनी पाहिला आहे.