Success Story of PSI: सध्या दहावी, बारावीच्या निकालाचे दिवस आहेत. बोर्डाची परीक्षा म्हणून आपल्याकडे या निकालाला खूप महत्व दिले जाते. कोणाला किती टक्के मिळाले? कोण पहिला आला? अशा चर्चा रंगतात. यात अनुत्तीर्ण विद्यार्थी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा समजून आपल्या भविष्याची काळजी करत राहतात. पण असे अनेक विद्यार्थी आहेत, जे दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होते. पण त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. उत्तीर्ण झाले. आणि आज मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. अशाच एका पीएसआय अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

“आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर आलेल्या अपयशाला तुमची ताकद बनवा”

पीएसआय संजय विघ्णे असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी स्वत:च्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. बारावीला ५६ टक्के गुण आणि गणितात तर केवळ ३५ टक्के घेऊन काठावर पास झालेला एक तरुण पुढे जाऊन एक पीएसआय अधिकारी होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र “आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर आलेल्या अपयशाला तुमची ताकद बनवा” हे लक्षात ठेवून जिद्दीनं संजय विघ्णे यांनी यशाला गवसणी घातली. कुठलीही एक परिक्षा म्हणजे तुमचं अख्खे आयुष्य नव्हे. या व्हिडीओमध्ये संजय यांनी त्यांची मार्कशीटही दाखवली आहे. यामध्ये इंग्रजीमध्ये – ५३, मराठीमध्ये – ८३, भूगोल- ६८, गणित – ३५, फिजीक्स – ३९, केमिस्ट्री – ४८ आणि पर्यावरण शिक्षण – ३८ असे गुण त्यांना बारावीला मिळाले आहेत.

म्हणूनच आजच्या बारावीच्या निकालात यश आले तर लगेच हुरळून जाऊ नका अन् अपयश आले तर खचूनही जाऊ नका. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणण्यापेक्षा अपयश हे तर यशाचे पूर्ण पुस्तक असते, ज्याच्या शेवटच्या पानावर यश असते. ते गाठण्यासाठी अपयशाचे संपूर्ण पुस्तक वाचावे लागते. याचाच अर्थ प्रयत्न करा, यश शिखरावर मिळेलच’, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDOE: हिरवागार आंबा १ सेंकदात झाला पिवळा; आंबे पिकवण्याची ‘ही’ पद्धत पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे संजय यांचा प्रवास पाहून लक्षात येते. बोर्डाच्या परीक्षेत नापास होण्यापासून ते पहिल्याच प्रयत्नात पीएसआय होण्याचा प्रवास त्यांनी अनुभवला. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या निकालात मनासारखे गुण मिळाले तर शुभेच्छाच. पण कमी गुण मिळाले, अनुत्तीर्ण झालात तरी काही काळजी करु नका. पुन्हा तयारीला लागा. स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा. मग यश तुमच्याजवळच असेल.