नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची शेतकऱ्यांची तयारी असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे. सध्या देशामध्ये याच शेतकरी आंदोलनची चर्चा आहे. अगदी वृत्तपत्रांपासून ते वृत्तवाहिन्या आणि सोशल नेटवर्किंगवरही शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्व सामान्य व्यक्त होत असताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. अशाच एका संवादाच्या ट्विटवर फूड डिलेव्हरी अ‍ॅप असणाऱ्या ‘स्विगी’ने दिलेला रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

१४ हजारांहून अधिक फॉलोअर्स अशणाऱ्या क्रिपिएस्ट माईण्ड नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये ट्विट करणाऱ्या सोशल इन्फ्ल्युएन्सरने, “शेतकरी आंदोलनासंदर्भात (ठराविक नेत्याचा किंवा पक्षाचा) भक्त असणाऱ्या माझ्या एका मित्रासोबत चर्चा केली. त्याने मला आपण अन्नपदार्थांसाठी शेतकऱ्यांवर अवलंबून नसल्याचे सांगितले. आपण कधीही वाटेल ते अन्नपदार्थ स्विगीवरुन मागवू शकतो असं म्हटलं. त्यानंतर तू जिंकला म्हणून विषय सोडून दिला,” असं म्हटलं आहे.

या ट्विटला थेट स्विगीनेच रिप्लाय दिला आहे. अवघ्या पाच शब्दांमध्ये स्विगीने दिलेला रिप्लाय सध्या व्हायरल झाला असून तो सात हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. स्विगीने या ट्विटला रिप्लाय करताना, “आम्हाला माफ करा शिक्षणावर खर्च झालेला पैसा आम्ही रिफंड करु शकत नाही,” असं म्हटलं आहे. या ट्विटच्या शेवटी स्विगीने निराश होऊन डोक्यावर हात मारणारा इमोन्जीही वापरला आहे.

सामान्यपणे ट्विटवरुन खाण्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर स्विगीकडून त्या खाद्यापदार्थांवर कॅशबॅक किंवा रिफंडसंदर्भात माहिती दिली जाते. मात्र करण्यात आलेला दावा योग्य नसल्यास स्विगीकडून रिफंड म्हणजेच पैसे परत दिले जात नाहीत. याच आपल्या स्टाइलमध्ये ज्या ट्विटला स्विगीने रिप्लाय दिला आहे. त्या ट्विटमधील शेतकऱ्यांसंदर्भातील दावा हा मान्य करण्यासारखा नसल्याचे स्विगीने अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.


अन्नपदार्थांसाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो असं म्हणणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणावरील खर्च व्यर्थ असल्याचा खोचक टोला स्विगीने लगावला आहे. सध्या स्विगीच्या या ट्विटची चांगलीच चर्चा सोशल मिडीयावर रंगली असून अनेकांनी स्विगीच्या हजरजबाबीपणाला दाद दिली आहे.