भारत आणि तैवानमध्ये मागील काही काळापासून राजकीय संबंध खूपच चांगले झाले असून दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध सध्या चांगलेच चर्चेत आहेत. असं असतानाच आता तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग वेन यांनी भारतीय संस्कृतीबद्दल असणारं प्रेम व्यक्त केलं आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी ट्वीटरवरुन आपल्याला भारतीय खाद्य पदार्थ आणि चहा खूप आवडतो असं म्हटलं आहे. मी अनेकदा चना मसाला आणि नान खाण्यासाठी भारतीय रेस्टॉरन्टमध्ये जाते असं वेन यांनी म्हटलं आहे.

“आमच्या देशात अनेक भारतीय रेस्टॉरन्ट आहेत आणि येथील जनतेला ती विशेष आवडतात. याबाबतीत तैवान खूपच नशीबवान आहे. मी स्वत: अनेकदा चना मसाला आणि नान खाण्यासाठी भारतीय रेस्टॉरन्टमध्ये जाते. तर भारतीय पद्धतीचा चहा माला माझ्या भारत दौऱ्याची आठवण करुन देतो. कायम सतेज असणारा आणि वेवेगळ्या रंगानी नटलेला भारत मला चहा पिताना आठवतो. तुम्हाला कोणता भारतीय पदार्थ आवडतो?,” असं ट्विट वेन यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन केलं आहे. सध्या हे ट्विट चांगलचं व्हायरल झालं आहे.

भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण संबंधांनंतर भारतीय लोकं तैवानचे कौतुक करताना आणि त्यांच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीयांनी ट्विटरवरुन तैवानमधील नागरिकांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळालं होतं. वेन यांनी याबद्दल भारतीयांचे आभारही मानले होते. वेन यांनी भारतीय लोकं, भारतीय संस्कृती आणि येथील वास्तू रचनेचे कौतुक केलं होतं.

तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारतीयांनी पाठवलेल्या शुभेच्छांना उत्तर देताना वेन यांनी भारतीयांचे ट्विटरवरुन आभार मानले होते. भारतीयांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार. आपण स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांसारख्या मुल्यांचे संवर्धन केलं पाहिजे. आपल्या देशातील लोकशाही मुल्यांचे आणि जीवनशैलीवर आपल्याला अभिमान असायला हवा. नमस्ते, असं ट्विट वेन यांनी केलं होतं.