हैदराबादमध्ये एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे घडावं तशी एक घटना घडली. तीन वर्षांपूर्वी तीन लहान बहिणींनी त्यांचे एकमेव  पालक गमावले. त्यापैकी दोघींना हैदराबादमधील वेगवेगळ्या अनाथालयांमध्ये जाण्याचा मार्ग सापडला तर सर्वात लहान मुलगी रस्त्यावर भटकत होती. त्यांची पुन्हा एकदा भेट होण्यासाठी एखादा चमत्कार घडला असचं म्हणावं लागेल. रविवारी बहिणी पुन्हा एकदा एकत्र आल्या. हैदराबादचे जिल्हा कल्याण अधिकारी आकेश्वर राव म्हणाले, “हा नशिबाचा खेळ होता.” आकेश्वर राव यांनी या अविश्वसनीय कथेमध्ये मुख्य भूमिका बजावली. विज्ञान प्रदर्शनातल्या फोटोंमुळे ताटातूट झालेल्या या तीन बहिणींची भेट पुन्हा झाली.

नक्की काय झालं?

“आमच्या राज्यातील अनाथालयांमध्ये अधिकारी आणि समुपदेशक अनेक कार्यक्रम आयोजित करून मुलांच्या सहभागाला प्रोत्साहित करतात. त्यापैकीचं एक म्हणजे या वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केलेला विज्ञान मेळावा होता. मेळाव्याचे काही फोटो अनाथ आश्रमांमध्ये प्रसारित केले गेले. हे फोटो बघून १२ आणि १४ वर्षांच्या दोन मुलींनी त्यांच्या केअरटेकरला सांगितले की त्या फोटोतली मुलगी त्यांच्या हरवलेल्या बहिणीसारखे दिसते. ”राव म्हणाले.राव पुढे सांगतात की, “या मुली त्यांच्या वडिलांसोबत राहत होत्या पण जेव्हा तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांना अनाथाश्रमात आणलं गेलं. त्या अधिकाऱ्यांना सांगत होत्या की त्यांना एक लहान बहीण आहे, जी त्यांच्या आजीबरोबर राहत होती. त्यांनी ती कशी दिसते ते देखील सांगितले आणि तशीच एक मुलगी त्या फोटोमध्ये होती.’’

कशी भेट झाली?

“आम्हाला नंतर लक्षात आले की सर्वात लहान बहिणीला दोन वर्षांपूर्वी आमच्याच अधिकाऱ्यांनी रस्त्यावरून अनाथाश्रमात आणलं होते आणि तिला एका वेगळ्या अनाथाश्रमात ठेवले होते. आमचा विश्वास आहे की आजीच्या मृत्यूनंतर ती रस्त्यावर भटकू लागली असावी. ”ते सांगतात. “जेव्हा आम्ही सर्वात लहान बहिणीला तिच्या दोन मोठ्या बहिणींकडे आणले तेव्हा तिने त्यांना ओळखले नाही. पण त्यांना खात्री होती की ती त्यांची हरवलेली बहीण आहे. आम्ही तिघांची डीएनए चाचणी घेण्याचे ठरवले आणि चाचणी यशस्वी झाली.”

अशाप्रकारे विज्ञान प्रदर्शनातल्या फोटोंमुळे आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने या तिघींची तीन वर्षानंतर भेट झाली. कल्याण अधिकारी आकेश्वर राव म्हणतात की, “आता या बहिणी त्यांच्या पुन्हा झालेल्या भेटीचा आनंद घेत आहेत.”आय. ए. येस. ऑफिसर स्मिता सभरवाल यांनीही या घटनेबद्दल ट्विट करत कल्याण अधिकारी आकेश्वर राव यांचे कौतुक केले आहे. 

या घटनेला त्यांनी "भावनांनी एकत्र" असं कॅप्शन दिल आहे.