अवघ्या दोन केळ्यांसाठी एका पंचतारांकीत हॉटेलने अभिनेता राहुल बोसकडून 442 रुपये बिल आकारल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच आता अजून एका हॉटेलने अशीच करामत केलीये. मुंबईतील फोर सीझन्स या हॉटेलने दोन उकडलेल्या अंड्यांसाठी तब्बल 1700 रुपये बिल आकारल्याचा प्रकार समोर आला आहे.

कार्तिक धर नावाच्या एका लेखकासोबत हा प्रकार घडला असून याबाबत त्यांनी अभिनेता राहुल बोस याला टॅग करुन ट्विटरद्वारे मिश्किल प्रश्न विचारलाय. ‘मुंबईच्या फोर सीझन्स हॉटेलने दोन अंड्यांसाठी 1700 रुपये बिल आकारलं, भावा आंदोलन करायचं का?’ असं ट्विट त्याने केलंय. आपल्या ट्विटसोबत कार्तिकने हॉटेलने आकारलेलं बिल दिसत असून यामध्ये हॉटेलने अंड्यांव्यतिरिक्त ऑम्लेटसाठीही अव्वाच्या सव्वा बिल आकारल्याचं स्पष्ट दिसतंय. एका ऑम्लेटसाठी हॉटेलने 850 रुपये, तर दोन ऑम्लेटसाठी 1700 रुपये बिल आकारण्यात आलंय.


कार्तिक धरने याबाबत ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून याबाबत हॉटेल विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इतक्या पैशांमध्ये 870 अंडी विकत घेता आली असती आणि गल्लीतील लोकांनी पोटभरुन खाल्लंही असतं, अशी प्रतिक्रिया एका ट्विटर युजरने दिली आहे. तर, काय डायनासॉरची अंडी उकडून दिली होती का? , अंड्यांमधून सोनं निघालं काय? अशाप्रकारचे प्रश्न विचारुन नेटकरी याविरोधातील आपला संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, हॉटेल प्रशासनाडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

यापूर्वी, चंदीगडमधील जेडब्लू मॅरिएट हॉटेलने अभिनेता राहुल बोसकडून दोन केळ्यांसाठी 442 रुपये आकारले होते. राहुलने त्या बिलाचा फोटो ट्विट केल्यानंतर पंजाब सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने त्या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यानंतर जीएसटी कलम 11 चं उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलला 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.