एखादी सवय आपल्या कधी कधी इतकी अंगवळणी पडते की, याच सवयीमुळे आपली फजितीदेखील होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर अमेरिकन सिनेटर ओरिन हॅच यांच्या ‘आभासी’ चष्म्याची सर्वाधिक चर्चा आहे. आपला चष्मा काढून बाजूला ठेवण्याची ओरिन यांना सवय आहे. पण, त्यादिवशी नेमके ते आपला चष्मा विसरले पण सवयीप्रमाणे डोळ्यांवर लावलेला चष्मा बाजूला काढण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही हात पुढे केले. डोळ्यांवर चष्मा नव्हता हे त्यांच्या चुकूनही त्याक्षणी लक्षात आले नाही, इतकंच नाही तर या नादात त्यांनी डोळ्यांवरचा आपला ‘आभासी’ चष्मा काढून तो खालीदेखील ठेवला.

काही सेकंदात त्यांना आपण काय केलं हे लक्षात आलं. पण, आपली चूक इतरांच्या लक्षात येऊ नये हे दाखवण्यासाठी त्यांनी जणू काही घडलंच नाही अशा अविर्भावात काम सुरू ठेवलं. ८३ वर्षीय ओरिन यांचा हा अभिनय लोकांना एवढा आवडला की त्यांचा हा ‘आभासी चष्म्या’चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही तर नवलच. अनेकांनी तर ओरिन यांची टेर उडवली आहे. पण, ओरिन यांनी ही थट्टा मस्करी आपल्या जिव्हारी फार लावून न घेता तेही या थट्टा मस्करीत सहभागी झाले. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत मी तर अदृश्य चष्मा लावाला होता असं मजेशीर ट्विट त्यांनी केलं. पण थोड्यावेळ्यानं मात्र मी खरंच चष्मा विसरलो होतो असं त्यांनी खुलेपणानं मान्यदेखील केलं.