scorecardresearch

अतीहुशारी नडली! फाटक ओलांडताच वेगाने येणारी एक्स्प्रेस पाहून बाईकसह ट्रॅकवर पडला अन् त्यानंतर…; पहा व्हिडीओ

वेळ वाचवण्यासाठी फाटक ओलांडून जाणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं

Viral Video, Biker, Rajdhani Express,
वेळ वाचवण्यासाठी फाटक ओलांडून जाणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं

वेळ वाचवण्यासाठी फाटक ओलांडून जाणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फाटक ओलांडून दुचाकीस्वार पुढे जाताच त्याला समोरुन राजधानी एक्स्प्रेस वायूवेगाने येताना दिसली आणि घाबरल्याने दुचाकीसोबत त्याचा तोल गेला. यानंतर दुचाकी सोडून मागे आल्याने थोडक्यात त्याचा जीव वाचला. मात्र दुचाकीचा ट्रेनखाली आल्याने अक्षरश: चुराडा झाला. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ मुंबईतील आहे, पण नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

१२ फेब्रुवारीची ही घटना असून सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये दुचाकीस्वार ट्रेन येताच दुचाकी सोडून जीव वाचवत असल्याचं दिसत आहे. ट्रेन आल्याने जीव वाचवण्यासाठी त्याने ट्रॅकबाहेर उडी मारली असली तरी दुचाकी ट्रेनखाली आल्याने चुराडा होऊन तिचा काही भाग त्याला लागल्याचं दिसत आहे.

अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओत अवघ्या काही सेकंदांमुळे त्याचा जीव वाचला असला तरी त्याला इजा झाल्याचं दिसत आहे. दुर्घटनेनंतर धक्का बसलेल्या अवस्थेत आण लंगडत तो दुचाकीस्वार बाहेर जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकजण यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अनेकांनी यावरुन टीका केली असून अशावेळी थोडा संयम बाळगण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी दुचाकीचं नुकसान झाल्याने त्याला धक्का बसला असून चांगलाच धडा मिळाल्याचं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of biker narrowly escapes speeding rajdhani express in mumbai sgy

ताज्या बातम्या