प्रत्येकाला आपल्या लग्नात सर्व काही आश्चर्यकारक आणि हटके करायचे असते. लग्नसोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक सजावटीपासून ते वधू-वरांच्या एन्ट्रीपर्यंत सर्वच गोष्टींवर भरपूर पैसा खर्च करतात. त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नपत्रिका. अनेक जण लग्नपत्रिकेवरही हजारो रुपये खर्च करतात. आपली लग्नपत्रिका इतरांपेक्षा वेगळी असावी आणि अनेकांनी तिचे वेगळेपण चारचौघांत सांगावे, अशी काहींची इच्छा असते. त्यामुळे हटके लग्नसोहळ्याची सुरुवात लग्नपत्रिका निवडण्यापासूनच होते, असे म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नपत्रिकेचा फोटो खूप व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल! पण, त्या लग्नपत्रिकेत काय हटके आहे ते जाणून घेऊ…
सोशल मीडियावर तुम्ही अनेक हटके लग्नपत्रिका पाहिल्या असतील; पण सध्या इन्स्टाग्रामवर अशी एक लग्नपत्रिका व्हायरल होत आहे, जी पाहून लोकांना अरे, हे एटीएम कार्ड आहे की लग्नपत्रिका, असा प्रश्न पडला आहे. होय! कारण ही लग्नपत्रिका हुबेहूब डेबिट किंवा क्रेडिट कार्डसारखी दिसत आहे.
या कार्डाच्या एक साइडवर ‘वेडिंग इन्व्हिटेशन’सोबत वधू-वरांची नावे आणि लग्नाची तारीख लिहिलेली आहे; तर दुसऱ्या साइडला लग्नस्थळाच्या पत्त्यासह उर्वरित महत्त्वाची माहिती छापण्यात आली आहे. एटीएमवर ज्याप्रमाणे ठरावीक जागेत ठरावीक गोष्टी लिहिलेल्या असतात, अगदी त्याचप्रमाणे एटीएम कार्डप्रमाणे दिसणाऱ्या या लग्नपत्रिकेवर सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.
हटके लग्नपत्रिकेची युजर्समध्ये चर्चा
@itsallaboutcards नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरून हे अनोखे वेडिंग कार्ड पोस्ट करण्यात आले आहे. पण, आता सोशल मीडियावर या एटीएम कार्ड थीम असलेल्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा आहे. अनेक युजर्सना ही हटके लग्नपत्रिका फार आवडली आहे.
त्यामुळे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता ही लग्नपत्रिका शेअर केली जात आहे; ज्यावर लोकांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी ते एटीएम कार्ड असल्याचे म्हटले आहे; तर काहींनी ही भन्नाट लग्नपत्रिका असल्याचे म्हटले आहे.