30 March 2020

News Flash

मरण माझे मरोन गेले..

हृदयातील ज्ञानदिवा प्रकाशल्यानंतर होणारा ‘तेथीचा आनंद’ ब्रह्मांडातही न मावणारा.

सके १५७१ वीरोधींना शंवछरे शीमगा वद्य द्वीतीया : वार सोमवार. ते दीवसीं : प्राथ:काळी : तुकोबांनी : तीर्थास प्रयाण केले : शुभ भवतु: मंगळं

देहू येथे देहूकरांच्या पूजेतील अभंगाच्या वहीतील हा उल्लेख सांगतो, की तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितियेचा. शक १५७१. सन १६४९. वार सोमवार. (अभ्यासकांच्या मते- शनिवार.)

आदल्या दिवशी होळीचा सण साजरा झाला होता. दुसरा दिवस धुळवडीचा. सकाळी अवघे देहू त्यात रंगले असतानाच हे आक्रीत घडले होते. तुकोबा ‘आद्रश’ झाले होते.

इंद्रायणी तीरी शोकसागर दाटून आला होता. तुकयाबंधू कान्होबांची छाती फुटून आली होती. तुकोबांची तिशी-पस्तिशीतली पत्नी जिजाई तेव्हा गर्भवती होती. तिच्या शोकाला पारावार नव्हता. महादेव, विठोबा ही मुले आक्रंदत होती.

तुकोबांचे काय झाले हे मात्र कोणालाच समजत नव्हते.

‘आता दिसो नये जना। ऐसें करा नारायणा।।’ असे तुकोबा म्हणत होते, हे खरे. संतांना ते विनवीत होते, की त्या वैकुंठाच्या राण्याला सांगा, की तुकोबाला लवकर घेऊन जा. – ‘तुका म्हणे मज आठवा। मूळ लौकरी पाठवा।।’ – हेही खरे. पण ही भावना का आजचीच होती?

‘अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति।

मुळींची जें होती आच्छादिली।।’

हृदयातील ज्ञानदिवा प्रकाशल्यानंतर होणारा ‘तेथीचा आनंद’ ब्रह्मांडातही न मावणारा. त्या आनंदाच्या डोही बुडण्याची आस त्यांना नित्य लागलेली होती. पुढे तर आपणच अवघ्या विश्वात भरून राहिलो आहोत. अणुरेणुया थोकडा- अणुरेणूंहून सूक्ष्म झालो आहोत आणि त्याच वेळी आकाशाएवढे विशाल झालो आहोत. आपले मरणच आता मरून गेले आहे. कारण आपुल्या मरणाचा अनुपम्य सोहळा आपण आपल्याच डोळ्यांनी पाहिला आहे, अशा आध्यात्मिक मनोवस्थेपर्यंत येऊन ठेपल्यानंतर माहेराला जाण्याची ओढ मनी बाळगूनच ते नित्याचे व्यवहार करीत होते.

‘पैल आले हरि।’ किंवा ‘पाहुणे घरासी। आजी आले हृषीकेशी।।’ असे उन्मनी अवस्थेतील भास तर त्यांनी सांगून ठेवले आहेत.

पण भासच ते. त्या शिमग्याच्या दिवशी ते खरे ठरले होते काय?

गाथ्यात ‘स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग’ असा २४ अभंगांचा गट येतो. त्यातून परंपरेने काढलेला अर्थ आपल्यासमोर आहे, की त्या दिवशी तुकोबांनी सगळी निरवानिरव केली. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हाती आला।।’ असे सर्वाना सांगितले. ते इंद्रायणीवर आले. पलीकडच्या काठावर खुद्द शंखचक्र गदापद्मधारी पंढरीचा राणा आला होता. संगे गरुड होता. विठ्ठलाने त्यांना हात धरून विमानी बसविले.

मग काही दिवसांनी तुकोबांचे पत्र आले, की ‘वाराणसीपर्यंत असों सुखरूप। सांगावा निरोप संतांसी हा।। येथूनियां आम्हां जाणें निजधामा। सवें असे आम्हां गरुड हा।।’

या सर्व अभंगांमधून तुकोबा स्वत:च सांगताना दिसतात, की ‘हाती धरोनियां देवें नेला तुका।’ पुढे ते म्हणतात, ‘आता नाहीं तुका। पुन्हा हारपला या लोकां’ त्याही पुढे जाऊन ते स्वत:च सांगतात, की ‘अंतकाळी विठो आम्हांसी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।’ त्यानंतरच्या अभंगात ते म्हणतात, ‘तुका बैसला विमानी। संत पाहाती लोचनी।।’ आणि मग त्यांचे पत्र येते, की आम्ही वाराणसीपर्यंत सुखरूप पोचलो आहोत.

स्वत: विमानात बसल्यानंतर, कुडीसहित गुप्त झाल्यानंतर तुकोबांनी हे अभंग लिहून ठेवले असे ज्यांना समजायचे त्यांनी खुशाल समजावे. परंतु एक तर ते अभंग नंतर कोणी घुसडून दिले असणार किंवा तो तुकोबांच्या मनीचा अनुभव असणार. याशिवाय त्याची संगती लावता येत नाही.

नवल याचेच, की कान्होबा याबद्दल काहीच बोलत नाहीत.

त्यांनी एकच धोशा लावलेला होता, की माझ्या भावाला भेटवा. तुकोबांना किती छळ सोसावा लागला याचे वर्णन करतानाच, ‘अझून तरी इतुक्यावरी। चुकवीं अनाचार हरी।’ असे ते म्हणत होते. हे अनाचार कोणते, कधीचे, ते कोण करीत होते, याबद्दल त्यांचे अभंग मूक आहेत. परंतु कान्होबा विठ्ठलाशी भांडताना म्हणत आहेत, ‘.. पहा हो नाहीं तरी। हत्या होईल शिरीं पांडुरंगा।।’ – माझ्या भावाला परत आणून दे, नाही तर त्याची हत्या तुझ्या माथी लागेल!

तुकोबांचे अकस्मात जाणे हे कान्होबांना अनाचारासारखे वाटत आहे. हे विचित्र आहे. देवाच्या विमानात बसून वैकुंठाला आपला बंधू गेला ही एवढी लोकांत अभिमानाने मिरवायची बाब. तो अनाचार असे त्यांना वाटत असेल तर भाग वेगळा. पण तुकोबांच्या सदेह वैकुंठ प्रयाणाबद्दल ते कुठेच काही बोलत नाहीत.

संत बहिणाबाई या त्या काळी देहूतच होत्या. त्याही वैकुंठगमनाच्या सोहळ्याबाबत काहीच बोलत नाहीत. बहिणाबाईंनी आपल्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींबद्दल लिहून ठेवले आहे. तुकाराम हे तर त्यांचे गुरू. त्यांच्याबद्दल आपल्या गाथ्यात त्या एवढेच म्हणतात, की ‘तुकारामा तंव देखतां देखत। आलें अकस्मात मृत्युरूप।।’

तुकारामपुत्र नारायणबाबा (जे तुकोबांच्या मृत्युसमयी जिजाईंच्या पोटात होते) ते १७०४ साली दुसऱ्या शिवाजीस दिलेल्या माहितीत एवढेच सांगतात, की ‘तुकोबा गोसावी देहू येथें भगवत् कथा करतां आद्रश जाले हे गोष्टी विख्यात आहे.’

पण पुढे महिपतीबाबा, कचेश्वरभट्ट ब्रह्मे , एवढेच नव्हे तर तुकोबांचे समकालीन रामेश्वरभट्ट हे सगळे तुकोबांनी ‘कुडी सायोज्जीं नेली’, ते विमानात बसून सदेह वैकुंठी गेले असे सांगताना दिसतात. म्हणजे त्या समयी तेथे उपस्थित नसणारी मंडळी (यांत रामेश्वरभट्ट हेही आले. वा. सी. बेंद्रे यांच्यानुसार ते त्या वेळी देहूत नव्हते.) या अशा कथा सांगत असताना कान्होबा, बहिणाबाई हे तेव्हा देहूतच असणारे मात्र त्यांना अजिबात दुजोरा देत नाहीत.

तेव्हा प्रश्न असा येतो, की मग तुकोबांचे नेमके काय झाले?

ते देहूकर नागरिकांच्या समक्ष – चित्रपट वा चित्रांत दाखवितात तसे – विमानात बसून वैकुंठाला गेले, कुडीसह अकस्मात गुप्त झाले, काही चरित्रकार सांगतात त्याप्रमाणे इंद्रायणीत त्यांनी जलसमाधी घेतली, इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे ते म्हातारपणी मरण पावले आणि त्यांचे पार्थिव लाकडी विमानात ठेवून स्मशानात नेण्यात आले, की वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी धुळवडीच्या त्या दिवशी त्यांची हत्या झाली?

गेल्या शतकापासून हा महाराष्ट्रातील एक मोठा वादविषय आहे. अनेक वारकऱ्यांची श्रद्धा, तुकोबांच्या काही चरित्रकारांचे मत सदेह वैकुंठगमनाच्या बाजूचे आहे. तर पांडुरंग कवडे, सुदाम सावरकर, तसेच डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारख्या अभ्यासकांनी तुकोबांची हत्या झाल्याचे दाखवून दिले आहे. ‘लावूनि कोलीत। माझा करितील घात।।’ ही तुकोबांच्या मनीची भयशंका सनातनी वैदिकांनी खरी करून दाखविली आणि मग आपले पापकर्म उजेडात येऊ  नये म्हणून त्यांनी वैकुंठगमनाची कथा रचून पसरवली, असे त्यांचे म्हणणे आहे.

तुकोबांच्या जिवावर उठलेली मंडळी तेव्हा होती हे खरे. खुद्द कान्होबाही ‘तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें। न विचारी आपुलें तोंडी मुतें।।’ किंवा ‘मद्यपी तो पुरा अधम यातीचा। तया उपदेशाचा राग वायां।।’ असे सांगत तुकोबांच्या विरोधकांकडे बोट दाखवत आहेत.

येथे प्रश्न असा येतो, की शिवरायांच्या राजवटीत हे होऊच कसे शकले? त्यांनी याची दखल घेतली कशी नाही? पण एकतर तेव्हा स्वराज्य स्थापनेची धामधूम चाललेली होती. आदल्या वर्षी हे स्वराज्यच संकटात सापडले होते. शहाजीराजांना कैद झाली होती आणि शिवरायांवर फतहखान चालून आला होता. ते संकट त्यांनी परतवून लावले, पण अजून शहाजीराजांची सुटका व्हायची होती. अर्थात तुकोबांची हत्या ही काही लहान घटना नव्हे. तेव्हा शिवरायांनी त्याकडे लक्ष दिले नसते का असा सवाल येतोच. पण मग तुकोबांचे वैकुंठगमन हीसुद्धा जगावेगळीच घटना. तिची दखलही त्यांनी घ्यायला हवी होती. तर तसे काही घडल्याचे पुरावे नाहीत.

एकंदर ठोस पुरावे कशाचेही नाहीत. ना वैकुंठगमनाचे, ना हत्येचे. श्रद्धा किंवा अभ्यासपूर्ण तर्क हीच त्याच्या निर्णयाची साधने. यात ठामपणे सांगता येते ते एवढेच, की तुकोबा अचानक नाहीसे झाले. देहासह नाहीसे झाले.

पण तुकोबांसारख्या व्यक्तींना मृत्यू नसतो. त्यांचे मरण कधीच मेलेले असते.

‘मरण माझे मरोन गेले। मज केले अमर।।’ असे तुकोबा म्हणतात ते किती खरे आहे!..

तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2016 4:40 am

Web Title: life and teachings of tukaram
Next Stories
1 त्या शोंकें मेदिनी फुटो पाहे..
2 पाईक तो प्रजा राखोनियां कुळ
3 पाईकपणे जोतिला सिद्धांत
Just Now!
X