News Flash

पाषाण फुटती ऐसे दु:ख

देहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.

१६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.

सतराव्या शतकाचा प्रारंभीचा काळ. मुहमद तुघलक याच्या पदरीच्या गंगू ब्राह्मणाचा चाकर जफरखान ऊर्फ हसन याने स्थापन केलेल्या बहमनी साम्राज्याचे कधीच विघटन झाले होते. निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही एकमेकांशी आणि दिल्लीशी झगडत होती. तो सत्तेचा लढा होता. पण शिया विरुद्ध सुन्नी असेही त्याचे एक रूप होते. त्यात मराठे सरदार कधी याची, तर कधी त्याची चाकरी करीत होते. निजामशाहीत मलिक अंबर सर्वसत्ताधीश झाला होता आणि तो मुघलांबरोबर लढत होता. तशात १६०५ मध्ये अकबराचा मृत्यू झाला. जहांगीर सत्तेवर आला आणि त्याने पुन्हा दक्षिणेकडे लक्ष वळविले. १६०८ मध्ये त्याने खानखानान याला दक्षिणेच्या बंदोबस्तासाठी पाठविले. अहमदनगर हे त्याचे एक लक्ष्य होते. त्याभोवतीचा अवघा परिसर रणभूमी झाला होता. देहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.
‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ असे तुकाराम म्हणतात तेव्हा ते केवळ त्यांच्या आंतरिक संघर्षांबद्दलच नसते, तर ते या युद्धलिप्त परिस्थितीबद्दलही असते. हा युद्धाचा प्रसंग कसा होता? गनिमांची टोळधाड यावी आणि गावेच्या गावे, शेतेच्या शेते उद्ध्वस्त करून जावी. पिकल्या वावरांत घोडे घालावेत. उभी पिके कापून न्यावीत. कणग्या लुटून न्याव्यात. जुलूम-जबरदस्ती करावी. बाया बाटवाव्यात. शत्रूची अशी ‘रहदारी’ झाली की काय होई याची कल्पना शिवकालीन पत्रसारसंग्रहातील एका पत्रावरून यावी. त्यात पिंपळगावचा पाटील लिहितो-
‘साल गुदस्ता मोगली गावावरी धावणी करून गाव मारिला. वस्तभाव, गुरेढोरे तमाम गावाचा बंद धरून नगरास आणिला. माणसे, दादले व बाइला व लेकरे यैसी सेदीडसे बंदी राहिली. कितेक बंदीखानी मेली. मग दरम्यान भले लोक होऊन खंडणी होनु २५०० झाडा करणे कुलबंद सोडनुक केली.’
अशा परिस्थितीत कसले स्थैर्य आणि कसला धर्म? सारी नैतिकता सत्तेच्या पायी सांडलेली. तुकारामांनी एके ठिकाणी उद्वेगाने म्हटले आहे-
‘संता नाहीं मान। देव मानी मुसलमान।।
ऐसें पोटाचे मारिले। देवा आशा विटंबिले।।
घाली लोटांगण। वंदी निचाचे चरण।।’
हे जनसामान्यांचेच लक्षण होते असे नाही. तत्कालीन ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्येही याच वृत्तीने मूळ धरले होते. तुकयाबंधू कान्होबांनी यावर नेमके बोट ठेवले आहे. ‘विडे घेऊनी ब्राह्मण आविंदवाणी वदताती’, ‘अश्वाचियेपरी कुमारी विकती वेदवक्ते’, ‘राजे झाले प्रजांचे अंतक.’ ब्राह्मण अविंदवाणी बोलतात. वेद सांगणारे घोडय़ांप्रमाणे मुलींची विक्री करतात. ज्यांनी राखावयाचे तेच प्रजेचे मारेकरी झाले आहेत. आणि सर्वसामान्यांचा व्यवहार कसा होता? तुकयाबंधू सांगतात- ‘पिते पुत्र सहोदर एकाएक। शत्रुघातें वर्तती।।’ कुटुंबव्यवस्थेची अशी दैना झाली होती. ‘पुत्र ते पितियापाशीं। सेवा घेती सेवका ऐसी।। सुनांचिया दासी। सासा झाल्या आंदण्या।।’ एकंदर ‘असत्यासी रिझले जन’ ही तेव्हाची समाजगत होती.
याच काळात हिंदू धर्मात पंथापंथांचा गल्बला झाला होता. सनातन वैदिक धर्मात कर्मकांडांचा बुजबुजाट होता. वैदिक धर्मासमोर एकीकडून इस्लामचे आव्हान उभे ठाकले होते आणि दुसरीकडून नाथ, महानुभाव, गाणपत्य, शाक्त आदींच्या मागे समाज जात होता. सामान्य लोक ‘सांडूनिया द्विजवर। दावलपीर स्मरताती’ ही जशी तुकयाबंधूंची खंत होती, तसेच ब्राह्मणांतील ‘कित्येक दावलमलकास जाती। कित्येक पीरास भजती। कित्येक तुरूक होती। आपले इच्छेने’ हा समर्थ रामदासांच्या संतापाचा विषय होता. याविरोधात भक्तीचळवळीने पहिल्यापासूनच आघाडी उघडली होती. एकनाथांसारखे संत हिंदू-तुर्क संवादातून ‘आम्हांसी म्हणता पूजिता फत्तरें। तुम्ही का मुडद्यावर ठेविता चिरे। दगडाचे पूजितां हाजी रे। पीर खरें ते माना।। केवळ जे का मेले मढें। त्याची जतन करतां हाडें। फूल गफल फातरियावरी चढें। ऊदसो पुढें तुम्ही जाळा।’ असे सांगत ‘हिन्दूकू पकडकर मुसलमान करो। हिन्दू करितां खुदा चुकला। त्याहून थोर तुमच्या अकला। हिन्दुस मुसलमान केला। गुन्हा लावला देवासी।’ असे बजावत होते.
आणि इकडे तुकाराम ‘अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे। अल्ला बिगर नहीं कोय। अल्ला करे सोहि होय।’ असे सांगतानाच ‘सब रसों का किया मार। भजनगोली एक हि सार।’ असा भक्तिमार्गाचा उपदेश करीत होते. ‘मेरी दारू जिन्हें खाया। दिदार दरगा सो हि पाया।’ हा तुकारामांचा दखनी बोल भक्तीचळवळीच्या आत्मविश्वासातूनच प्रकटला होता. पण तुकारामांपुढचे खरे आव्हान होते ते सामाजिक आणि धार्मिक अनैतिकतेचे.
ही अनैतिकता, हा भ्रष्टाचार, समाजाचा ऱ्हास हे सगळे कोठून आले? तुकोबांनाही हा प्रश्न पडलेला आहे. ‘वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य। न करिती विचार कां हिताचा।।’ समाज असा एकाएकी कोसळून का पडला? त्याला सुलतानी संकटे कारणीभूत होतीच; पण अस्मानी संकटांनीही त्याच्या मूल्यविवेकाचा घात केला होता, ही बाब नीट ध्यानी घेतली पाहिजे. या अस्मानी संकटांचे तुकारामांच्या चरित्रात महत्त्वाचे स्थान आहे.
हे संकट होते थोरल्या दुष्काळाचे. साल होते सन १६३०. शिवजन्माचे.
‘भेणे मंद झाली मेघवृष्टी।’ त्याकारणे- ‘अपीक धान्यें दिवसें दिवसें। गाई म्हैसी चेवल्या गोरसें। नगरें दिसती उध्वंसे। पिकली बहुवसे पाखांडे।।’ असे या दुष्काळाबद्दल तुकयाबंधू सांगतात. डच कंपनीतील एक व्यापारी व्हॅन ट्विस्ट यानेही असेच लिहून ठेवले आहे- ‘पाऊस इतका अल्प पडला, की पेरणी केलेले बी तर वाया गेलेच, पण साधे गवतसुद्धा उगवले नाही. गुरेढोरे मेली. शहरांतून आणि खेडय़ांतून शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्यामुळे इतकी दरुगधी सुटली होती, की रस्त्यावरून जाणे भयावह होते. गवत नसल्यामुळे गुरेढोरे प्रेतेच खाऊ लागली.’ रामदास लिहितात- ‘देश नासला नासला!’
अशा काळात समाजाला ना नासलेपणाची चिंता असते, ना नीतिमूल्यांची काळजी. त्याला कसेही करून जगायचे असते. केवळ तग धरण्याच्या त्या प्रयत्नांतून येथे सामाजिक नीतिभ्रष्टतेचा, अनैतिकतेचा टारफुला फोफावला.
या दुष्काळाने अवघ्या एकविशीतल्या तुकारामांचे अवघे जगणे विस्कटून टाकले. ते सांगतात- ‘दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली।। लज्जा वाटे जिवा त्रासलों या दु:खे। वेवसाय देखें तुटी येतां।।’ या दुष्काळाने त्यांचे दिवाळे वाजविले. त्यांचे असे झाले, की- ‘काय खावें आता कोणीकडे जावें। गावांत रहावें कोण्या बळें। कोपला पाटील गांवींचे हें लोक। आतां घाली भीक कोण मज।। आतां येणे चवी सांडिली म्हणती। निवाडा करिती दिवाणांत।।’ तुकोबा म्हणतात, ‘काय विटंबना सांगो किती। पाषाण फुटती ऐसे दु:ख।’
ही तशी वैयक्तिक वेदना. पण व्यक्तीकडून समष्टीकडे, पिंडातून ब्रह्मांडाकडे जातात ते महापुरुष असतात. आपले कौटुंबिक दु:ख तुकोबांच्या जीवनी सामाजिक झाले. आणि त्यातून त्यांच्या आयुष्याचा भला थोरला अध्याय सुरू झाला..
tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:01 am

Web Title: sant tukaram birth
टॅग : Sant Tukaram
Next Stories
1 उजळावया आलो वाटा..
2 तुका लोकी निराळा : शब्दे वाटू धन जनलोका!
Just Now!
X