भारतात गेल्या काही वर्षांत ‘शिक्केबाजी’ने शिस्तपालन होते, असा शोध लागला आहे. ‘‘मांस खाल्ल्यामुळेच करोना होतो’’ हा अभ्यासक्रम व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात हल्ली हल्ली सुरू झाला. त्याआधीच गुजरातमध्ये एखाद्यावर मांसभक्षक असा शिक्का मारून त्याला आपल्या वसाहतीत घर मिळणे मुश्कील करणारे लोक, हे तनाने आणि मनाने भारतीयच होते! शेजारील राज्यामधील बांधवांचा कित्ता पुढे मुंबईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि विशेषत: पश्चिम उपनगरांत राहणाऱ्या काही जणांनी गिरवला, त्यास आता दोन दशके होतील.  सर्व शोध प्राचीन भारतातच लागले होते, या समजाला उत्तर प्रदेशात लागलेल्या या शोधाने मोठा हादरा दिला. तिथे जमावानेच एखाद्यावर गोहत्या करणारा असा शिक्का मारायचा, मग तिथल्या तिथे त्याला धडा शिकवायचा, असे शिस्तीचे पर्व, म्हणजे १९७५-७८ सालची मराठी भाषा वापरायची तर ‘अनुशासन पर्व’ २०१५ पासूनच सुरू झाले आहे. लक्षात घ्या, करोना वगैरे काहीही नव्हते, तेव्हाची ही गोष्ट. शिक्का आणि शिस्तपालन यांचा अतूट संबंध हा भारतीयांनीच शोधून काढलेला आहे.

लोकांनी एकमेकांवर असे शिक्के मारू नयेत, असे म्हणणारे काही मानवतावादी विश्वनागरिक आहेत.. त्यांच्याहीसाठी, ‘तुमचा भारताशी संबंधच नाही’ किंवा ‘तुम्ही अतिरेकीच आहात’ असे शिक्के तयार ठेवण्यात आले. मग सरसावले शिक्क्यांचे समर्थन करणारे लोक! ‘सामाजिक दबाव हवाच’ असे तत्त्वज्ञान त्यांनी व्हायरल केले. त्याहीनंतर हळूहळू, या शिक्क्यांना अधिकृत मान्यता मिळू लागली आहे. प्राचीन काळात ऋ षीमुनींची, सज्जनांची भूमी असलेल्या, सत्कर्मासाठीच्या यज्ञात बाधा नको, असुरांना नेहमीच पळवून लावणाऱ्या उत्तर प्रदेशानेच त्यासाठी पुढाकार घेतला असून पोलिसांना जे दंगलखोरांसारखे वाटतील त्यांची नावे, छायाचित्रे मोठय़ा फलकांवर लावण्याची सुरुवात या उत्तर प्रदेशातून अलीकडेच झाली.. न्यायालयाने मूलभूत अधिकार, राज्यघटना असे काहीतरी म्हणत या अभिनव, जाहीर शिक्केबाजीला खीळ घातली म्हणून; नाही तर उत्तर प्रदेशात सरकारविरुद्ध ब्र काढण्याचीही कुणाची हिंमत झाली नसती एवढी ताकद या उपायात नव्हती काय?

त्या मानाने, महाराष्ट्रातील काही ठिकाणी सुरू झालेला शिक्क्यांचा उपाय फारच सौम्य म्हणायला हवा. विमानतळावर किंवा अन्यत्र होणाऱ्या तपासणीनंतर ज्यांनी १४ दिवस लोकसंपर्क टाळून विलग राहणेच ठीक, अशा सर्वाच्या हातावर ‘इतरांना सुरक्षित ठेवत असल्याचा अभिमान- घरीच विलगीकरण’ असा शिक्का मारून तारखेचाही शिक्का उमटवला जाईल. या शिक्क्याचा संबंध सामाजिक शिस्तीसाठी होणाऱ्या शिक्केबाजीशी नाहीच, उलट हा सरकारी शिक्का जणू मतदानावेळी बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईसारखा आहे, असेही कुणी म्हणेल.. अर्थातच लोकशाही आहे! मात्र लोकशाहीत लोक फार प्रतिवाद वगैरे करतात. तेव्हा आणखी कुणी समजा शंका काढली की, ‘शिक्क्यांविना शिस्तपालन का होत नाही?’.. तर काय करावे? की ती शंका काढणाऱ्यांवरच, ‘शंकासुर’, ‘बरे चाललेले बघवत नाही’ असे शिक्के आपणही मारावेत?