21 September 2018

News Flash

गर्व से कहो.. अभिमान गीत!

हे म्हणजे खूप म्हणजे खूपच झाले म्हणायचे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हे म्हणजे खूप म्हणजे खूपच झाले म्हणायचे. ‘मराठी असे आमुची मायबोली’ या मराठी अभिमान गीतामधील एक कडवेच (कडवे म्हणजे स्टांझा.. कवितेत असतो तो!) वगळले म्हणे विधानभवनात. म्हणजे थेट विधानभवनात नव्हे, त्याच्या प्रांगणात. पण तरीही हे म्हणजे अतिच झाले. यापूर्वी मराठी आपली मंत्रालयाच्या दारात लक्तरे लेवून उभी होती ते ठीकच होते. मंत्रालयाच्या दारात तशीही माणसांची लक्तरे होतात. तेथे भाषेचे काय? परंतु विधानभवनाच्या प्रांगणातही मराठीच्या अभिमान गीताचाही अवमान व्हावा? बरे झाले विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा विषय हाती घेतला. म्हणजे काय, तर विधिमंडळात गदारोळ केला. त्या निमित्ताने मराठीप्रेमींना समजले तरी, की मराठी अभिमान गीतामध्ये काही कडवीही होती आणि त्यातले एक वगळण्यात आले. तोवर आमच्यासारख्या असंख्य कट्टर मराठीप्रेमींना असेच वाटत होते, की ‘मराठी असे आमुची मायबोली’ एवढेच मराठी अभिमान गीत आहे. त्यामुळे झाले काय, की आम्ही आपले मराठी आपली मायबोली आहे एवढे छाती फुगवून सांगितले आणि मराठी राजभाषा दिनी ते एकमेकांस व्हाट्स्यापले की झाले, मराठीचे पांग जे काही आहेत ते फेडले, असेच आजवर समजत होतो. परंतु ते तसे नाही. एखादे कडवे गाळले जावे इतकी कडवी त्या कवितेत आहेत. शिवाय त्याचे गाणेसुद्धा आहे. ते ऐकले, गायले वा वाजवले की मराठीचे भले होते या माहितीचे प्रसारण राजभाषा दिनीच झाले ते बरे झाले. त्याबद्दल मराठी भाषाप्रेमी मंडळींनी समस्त विरोधकांचा गदा देऊन सत्कारच करावा असा आमचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर विद्यमान सरकारचाही निषेध करावा, तो हलक्या आवाजात केला तरी चालेल, असाही आमचा एक उपप्रस्ताव आहे. हा निषेध होणे मात्र आवश्यकच आहे. कारण की शेवटी हा मराठी अस्मितेचा सवाल आहे. आमच्या मराठी अभिमान गीताशी कोणी असा खेळ करीत असेल आणि त्यातले शेवटचे की अधलेमधले कुणास ठाऊक, पण एक कडवेच वगळीत असेल, तर कडव्या मराठीप्रेमींनी त्याचा कडवटपणे प्रतिकार केलाच पाहिजे. अखेर अशा प्रतीकांमधूनच तर आपल्या अस्मिता सुखावल्या जात असतात. ती प्रतीके जगली पाहिजेत. त्यांचे ध्वज नाचवले गेले पाहिजेत. बाकी मग मराठी भाषेचे जे काही करायचे ते करण्यास आपण सारे समर्थ असतोच. म्हणजे मराठी शाळा बंद पडल्या, तरी त्याची फिकीर नसते. मराठी कथा-कादंबऱ्यांना कोणी पुसत नसले, तरी काळजी नसते. फार काय आपल्याच जिभेच्या दांडपट्टय़ाने मराठीची शब्दागणिक खांडोळी होत असली तरी चिंता नसते. उलट त्यात आपलाही फूल ना फुलाची पाकळी एवढा सहभाग असतोच. त्याची भरपाई मात्र अभिमान गीताने करायची असते. त्यात कोणत्याही प्रकारची गफलत झाली, तर ती मात्र अजिबात खपवून घेता कामा नये. अखेर मराठीचा अभिमान हा अपघात आणि योगायोग यांयोगे मराठी घरात जन्मास आलेली मराठीची लेकरेच बाळगणार ना? जरी त्या लेकरांच्या ओठांवरून मराठी भाषेची लक्तरे रुळत असतील, जरी त्यांना मराठी भाषापरंपरेची ओळख नसेल, तरी आणि खरे तर त्याची भरपाई म्हणूनच ‘गर्व से कहो, मराठी अभिमान गीत’ ही संस्कृती आपण रुजवलीच पाहिजे!

HOT DEALS
  • Samsung Galaxy J3 Pro 16GB Gold
    ₹ 7490 MRP ₹ 8800 -15%
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%

First Published on March 1, 2018 2:42 am

Web Title: articles in marathi on marathi language