एखाद्या गंभीर मुद्दय़ाकडे साऱ्यांचे लक्ष असताना टुकार विषय अचानक पुढे आणून त्याचीच चर्चा घडवत स्वत: प्रसिद्धीच्या झोतात राहायचे, हे तंत्र महाराष्ट्राला नवे नाही. दिल्लीत मात्र या तंत्रात, आपचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच आघाडीवर आहेत. मुद्दा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा. मोदी यांच्या पदव्या खऱ्या की खोटय़ा असा वाद चव्हाटय़ावर आणून अरविंद केजरीवाल यांनी देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या मुद्दय़ाला तोंड फोडल्याने, संसदेत गाजत असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात भाजप प्रत्यक्ष कारवाई का करीत नाही, हा मुद्दा जणू झाकोळून गेला आहे , किंवा काँग्रेसविरुद्ध सुरू असलेल्या टीकेवरून लक्ष उडवून काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत करण्याचा केजरीवाल यांचा डाव असावा. ऑगस्टा भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर संसदेत एवढा गदारोळ सुरू असतानाही आम आदमी पार्टीचा एकही सदस्य संसदेत नसल्याने केजरीवाल अस्वस्थ असावेत किंवा मोदी यांच्या पदव्यांचा मुद्दा ऐरणीवर आणून काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत करण्याचा केजरीवाल यांचा डाव असावा. पंजाबच्या निवडणुकीत मुसंडी मारण्याची संधी ‘आप’ला मिळणार असे बोलले जात असताना, भ्रष्टाचाराच्या तापलेल्या एकाही मुद्दय़ावरील चर्चेत ‘आप’ नाही, हे पचविणे केजरीवाल यांना अवघड जात असावे किंवा मोदी यांच्याविषयी सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रवादांना कायमची मूठमाती देण्यासाठी भाजपनेच ‘आप’ला ‘सुपारी’ दिली असावी.. यापैकी कोणतीही शक्यता नाकारता येत नसली तरी शक्यतांची माळ संपतच नाही. ‘आप’ने उभ्या केलेल्या वादळाचा कोणत्याच पक्षाला काहीच राजकीय लाभ मिळणार नाही, हे धुरळा खाली बसल्यानंतर स्पष्ट होईलच. तोवर केजरीवाल प्रसिद्धीसाठी दुसरा तात्पुरता मुद्दा शोधतील, आरोपांची राळ उठवतील.  निव्वळ गाजराची पुंगी वाजवायचा प्रयत्न करायचा- ती वाजलीच नाही, तर मोडून खाता येतेच- हे त्यांनाही चांगले माहीत आहे.