आकडय़ांशी खेळ करून कमाई करणे हाच ज्यांचा पूर्णवेळ व्यवसाय असतो, अशा माणसांचा अभ्यास करण्यात एक वेगळीच मौज असते. डोळ्यासमोर कायम आकडे नाचत असावेत आणि त्याच्या तालावरच मनही हिंदोळे घेत असावे असे त्यांच्या वागण्याबोलण्यावरून जाणवत असते. सट्टाबाजारात केवळ नशीब अजमावणाऱ्या एका व्यक्तीची जर ही अवस्था असेल, तर तो बाजार ज्यांच्या हातात आहे, बाजाराला केव्हा कसे वळण द्यायचे, हे ठरवून बाजारावरचे कोणते ओझे- म्हणजे त्यांच्या भाषेत, ‘लोड’- कसे कमीजास्त करावयाचे त्याची जबाबदारी असणाऱ्याची स्थिती कष्ट करून कमाई करणाऱ्या प्रामाणिकाला समजणे अंमळ कठीणच! कदाचित त्यामुळेच सट्टाबाजाराकडे सामान्य माणसे वळू शकत नाहीत, म्हणूनच त्यांना फावला वेळही मिळत असतो. अशा फावल्या वेळाचा सदुपयोग करण्याचे एक चांगले साधनही त्यांच्याकडे असते. राजकारण!.. सट्टाबाजार आणि सत्ताबाजारात केवळ उच्चारातील एका आघाताचा फरक असला, तरी सत्ताबाजारातील आकडय़ांचे खेळ सामान्यांना सहज न्याहाळता येतात. मुख्य म्हणजे, या आकडय़ांच्या खेळात सहभागी होऊनही, डोकेफोड करावी लागत नाही. ती करणारे कुणी वेगळेच असतात. कधी कधी ती सट्टाबाजाराहूनही क्लिष्ट असते. म्हणूनच, भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी मांडलेल्या ‘फिक्सिंग’च्या गणिताने सत्ताबाजारातील चढउतार घरबसल्या न्याहाळणाऱ्या सामान्य मतदारास करमणुकीबरोबरच मोफत डोकेफोड करून घेण्याचे ‘पॅकेज’ही प्राप्त झाले. या सत्ताबाजारातील आकडय़ांची गणिते मांडून त्यानुसार निकालाचे निष्कर्ष मांडताना आणि आकडय़ांवरील ‘लोड’ कमीजास्त करण्याचे खेळ करताना, भल्याभल्या मुरब्बींनाही जी कसरत करावी लागते, ते काम शेलारांनी अगदी सहजपणे ‘करून दाखविले’, हे तोंडात बोट घालावयास लावणारे आश्चर्य मानायला हवे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची जुळवाजुळव करताना, बंडखोरांना थंडोबा करताना आणि उमेदवार शोधताना मुळातच प्रत्येक पक्षाच्या तोंडाला फेस आलेला असताना, त्याही पुढे जाऊन काँग्रेससोबत फिक्सिंग करण्याचे कसब शिवसेनेला कसे साधले असेल आणि शेलारांनी ते कसे ओळखले असेल, हा प्रश्न आता सत्ताबाजारातील आकडय़ांचा खेळ न्याहाळणाऱ्यांना नक्कीच पडला असेल. एक तर स्वपक्षाच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करावे लागत असतानाही, वेळात वेळ काढून शेलार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्याही याद्यांचा एवढा सखोल अभ्यास करून ज्या वेगाने फिक्सिंगचा निष्कर्ष काढला, तो पाहता राजकारणात मुरलेल्या ‘पॉवरफुल’ नेत्यांनाही शेलारांना सलाम करावासा वाटला असेल. सत्ताबाजार हा ‘गेम’ आहे, त्यामध्येही आकडय़ांच्या खेळावरच नशिबाचा कौल लागतो. पण आकडय़ांची फिरवाफिरव करणाऱ्या अदृश्य हातात ते नशीब अडकलेले असते. शेलारांनी तर सत्ताबाजारातील या खेळाचेच तीनतेरा करून टाकले म्हणायचे!