युरेका, हायला, हुर्रा.. मनात हर्षोद्गारांची, मोदघोषांची केवळ गर्दी झाली आहे. काळीज आनंदाने भरून गेले आहे. हल्ली पाठीपर्यंत हात पोहोचू शकत नाही, तरीही स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घ्यावी असे वाटून राहिले आहे. अखेर आपल्या संशोधक बुद्धिसामर्थ्यांचे कौतुक आपण नाही करणार तर अन्य कोण? घडलेच असे आहे. शोधच तसा लागला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्र जागतिक स्पर्धेत एवढे मागे कसे येथपासून एकूणच भारतीयांमध्ये किलर इन्स्टिक्टची कमतरता का (बराच काळ आमचा समज असा, की हे कसलेसे स्टेरॉइड वगैरे असावे. परंतु ते तसे नाही.) असे अनेक प्रश्न केवळ आमच्याच नव्हे, तर सर्वश्री कलमाडी, गिल यांच्यापासून ते आमच्या सोसायटीतील कॅरम संघाचे प्रशिक्षक रा. रा. लेले यांच्यापर्यंत अनेकांस आजवर छळत होते. परंतु आम्हांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, की त्या सर्व कोडय़ांचे एकच एक उत्तर असून ते आम्हांस गवसले आहे. त्याचे झाले असे, की नेहमीप्रमाणे आम्ही असे विश्वाची चिंता करीत पडलो होतो. समोर च्यानेलीचर्चा सुरू होती. जेथे प्रत्येक जण मोठमोठय़ाने ओरडत आपला मुद्दा आपल्यालाच पटवून देत असतो त्यास च्यानेलीचर्चा म्हणतात. ती चंमतग पाहता पाहता समोरील पेपरे आम्ही वाचत होतो. वाचणे आणि पाहणे या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून केल्यास मेंदूस फार श्रम पडत नाहीत हा आमचा अनुभव. तर नेहमीप्रमाणे हे सुरू असतानाच अचानक एक बातमी डोळ्यांत गेली. बातमी आमच्या प्रिय गोव्याची. एरवी गोवा म्हटले की डोळ्यांसमोर काय काय उभे राहते.. पण ही बातमी वेगळी होती. बांदोडकर सुवर्णचषकातून सोने गायब झाल्याचे त्यात म्हटले होते. पूर्वी हा फुटबॉल चषक अस्सल सोन्याचा होता. २० लाखांचा. पण हल्ली तो सोन्याचा राहिला नाही. भलत्याच धातूवर सोन्याचा मुलामा चढविलाय असा संशय व्यक्त करण्यात आला होता. तो व्यक्त केला होता आमचे आदर्श राष्ट्रवादी नेते चर्चिल आलेमाव यांनी. आता सोन्याबाबत चर्चिलबाब बोलताहेत म्हटल्यावर शंका घ्यायला काही जागाच नव्हती. सोने बिस्किटांतले असो की चषकातले, त्यांच्या पारखी नजरेपासून ते सुटणारच नाही. तेव्हा बातमी खरीच असणार. येणेप्रकारे आम्ही त्या वृत्तावर सखोल व सांगोपांग विचार करीत असतानाच अचानक आमच्या दोन्ही मेंदूंतून एक विचारशलाका चमकली, की हे तर ते कारण नसावे की ज्यामुळे आज भारतातील क्रीडा क्षेत्र मागे पडले आहे? म्हणजे असे पाहा, एवढे झगडून ज्या सुवर्णचषकासाठी प्रयत्न करायचे, तोच चषक अखेर कथलाचा निघणार म्हटल्यावर रक्त आटवणार तरी कोण? लहानपणापासून एखादा खेळ अंगी लावून घ्यायचा, पदकांसाठी जिवाचे रान करायचे आणि अखेर जीव जगविण्यासाठी ती पदके विकायला जावीत तर ती तांब्या-पितळेची निघावीत म्हटल्यावर त्यासाठी झगडणार तरी कोण? हे प्रश्नोपनिषद समोर उभे ठाकले आणि दिठीसमोर जणू उत्तराचे शेकडो सूर्य चमकले. पण मंडळी, हे केवळ क्रीडा क्षेत्रापुरतेच मर्यादित आहे काय? आम्हांस तर पहिल्यापासूनच हा संशय आहे की सुवर्णाचे म्हणून जे जे गणले जाते ते ते सारे अखेर मुलाम्याचेच निघते. कसे होते हे? एखाददुसऱ्या चषकाची गोष्ट सोडून द्या, अख्ख्या देशाचाच असा ‘बांदोडकर चषक’ कसा काय होतो? सारीच मुलाम्याची नाणी खणखणीत बंद्या रुपयांप्रमाणे कशी काय मिरवली जातात?.. फार फार अवघड प्रश्न आहे हा.