24 January 2019

News Flash

रंग दे तू मुझको गेरुआ..

खोलवर विश्लेषण करता आपल्या लक्षात येईल की अखेर हे रंग असतात तरी काय?

रंग. कुणी त्याला कलर म्हणावे, कुणी वर्ण. परंतु खोलवर विश्लेषण करता आपल्या लक्षात येईल की अखेर हे रंग असतात तरी काय? येतात तरी कोठून ते? ते असतात पांढऱ्याफेक प्रकाशाचेच भाग. प्रकाशाच्या वेडय़ावाकडय़ा लहरींतून जन्मतात ते. समजा नसत्याच या प्रकाशलहरी विकृतपणे वागल्या, समजा नसतेच हे रंग.. तर? आमच्या एका विचारवंत स्नेह्य़ांना हा प्रश्न विचारला, तर ते ललित मराठीत म्हणाले, या जगात रंगच नसते, तर दुनिया किती बेरंगी झाली असती! त्यांचे हे विधान ऐकले आणि वाटले, अहाहा! केवढा चिंतनशील विचार हा! केवढी वैचारिक खोली! हे विधान अन्य एका स्नेह्य़ास ऐकविले, तर तो दातातील माव्याचा कण जिभेच्या टोकाने उडवावा इतक्या तुच्छतेने म्हणाला, हॅ! रंग नसते, तर दुनिया बेरंगी झाली असती हे सांगण्यासाठी हे असले विचारवंत कशाला हवेत? साध्या रंगाऱ्यानेही तेच सांगितले असते. परंतु एक मात्र खरे, की या रंगांनी जगात फारच बेरंग केला आहे. बघा ना, या रंगांनी किती समस्या निर्माण केल्या आहेत. रंग नसते या जगात, तर वर्णभेदाची समस्या निर्माण झाली नसती. ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ हा वाचून वाचून कंटाळा आलेला वृत्तपत्रीय मथळा जन्माला आला नसता. सर्व पुरुष मंडळी त्यांच्या-त्यांच्या पत्नीसमवेत बिनधास्त साडी खरेदीसाठी जाऊ शकली असती. रंगच नसल्याने ‘हा रंग शोभेल का हो मला,’ अशा भीषण काठिण्यपातळी असलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची काळ-वेळच त्यांच्यावर आली नसती. फार काय, रंग नसते तर निरनिराळे पक्ष निघाले नसते या जगात. पक्ष आले म्हणजे त्यांचे वेगवेगळ्या रंगांचे झेंडे आले. त्यासाठी वेगवेगळे रंग आले. किती भेद निर्माण करतात हे रंग. त्यांपेक्षा रंगच नसते तर किंवा एकच एक रंग असता तर? जगातील सर्व भेदाभेद भ्रम अमंगळ कुठल्या कुठे धुतला गेला असता. जगाचे सोडा, आपल्या देशात पाहा या रंगांमुळे किती भेद निर्माण झाले आहेत. कोणी पांढरे, तर कोणी खाकी, कोणी हिरवे, तर कोणी निळे, कोणी कोणी तर चक्क लाल! या रंगविविधतेपासून मुक्ती मिळाल्याशिवाय या देशात खऱ्या अर्थाने समरसता निर्माण होऊन एकात्मता नांदणार नाही. देशाचा विकास होण्यासाठी ही समरसता महत्त्वाची. ती साधायची तर हे सगळे रंग खोडून टाकले पाहिजेत. हे राष्ट्र आज आपणां सर्व राष्ट्ररंगाऱ्यांना ‘रंग दे तू मुझको गेरुआ’ अशी आर्त साद घालीत आहे. गेरुआ हा राष्ट्ररंग जाहीर व्हावा म्हणून विनवणी करीत आहेत. आपण त्याला प्रतिसाद देणार की नाही हा खरा प्रश्न आहे. ही दुर्दैवाचीच गोष्ट की, काळोखाचा रंगच ज्यांना प्रिय अशी काही मंडळी या रंगांतराला विरोध करीत आहेत. या मंडळींची मजल तर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रंग बदलण्यास विरोध करण्यापर्यंत गेली आहे! या अशा समाजात रंगभेद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचे खरे रंग समाजासमोर आणलेच पाहिजेत. किंबहुना ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे क्रांतिगीत विसरून आता ‘रंग दे तू मुझको गेरुआ’ हेच भक्ती-गीत गायला सुरुवात केली पाहिजे..

First Published on April 12, 2018 3:36 am

Web Title: br ambedkar statue in saffron colour