कायद्यातून पळवाटा, करचुकवेगिरी यात निष्णात असणाऱ्यांची संख्या देशात कमी नाही. अशा निष्णातांनी थोडी आर्थिक लालूच दाखवली की, हमखास बळी पडणारा मध्यमवर्गसुद्धा देशात भरपूर आहे. नागपुरात उघडकीस आलेला डब्बा ट्रेडिंगचा गैरव्यवहार हेच कथन करणारा आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे यात गुंतवणूक करणाऱ्या हजारोंवर आता डब्बे बडवण्याची वेळ आली आहे. सरकारकडून एकीकडे मेक इन इंडियाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शेअर बाजारावर चालणाऱ्या अशा जुगाराचे स्वरूप बघून कुणीही थक्क व्हावे, असेच हे प्रकरण आहे. खरे तर जेथे शेअर बाजार आहे अथवा जेथे या बाजारात उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे अशा मुंबई, अहमदाबादसारख्या शहरात या बाजाराला समांतर चालणारे जुगार चालायला हवे, पण चाणाक्ष व्यापाऱ्यांनी यासाठी नागपूर निवडले. व्यवहार करण्यासाठी बाजाराचा आधार घ्यायचा, पण उलाढाल मात्र बाहेर करायची, अशा स्वरूपाचा हा जुगार आधी वस्तूबाजारात खेळला जायचा. तेथे उलाढाल कर लागू झाला आणि जुगारी शेअरकडे वळले. केवळ वळलेच नाही, तर कारवाई झाली तर काहीच हाती लागू नये म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा बेमालूम उपयोगही केला. उलाढाल कर नाही, सेवाकर नाही, अधिकृत दलालीचा तर प्रश्नच नाही, अशी जाहिरात करत झटपट श्रीमंत होऊ पाहणाऱ्या अनेकांना या डब्ब्यात कोंबण्यात हे व्यापारी यशस्वी झाले. जादा परतावा मिळतो, या लालसेपोटी सारे नियम पायदळी तुडवण्यात मागेपुढे न बघणारे हजारो गुंतवणूकदार आता कारवाईची वृत्ते बघून घरातल्या घरात पार डब्ब्यात गेले आहेत. सारा व्यवहारच आतबट्टय़ाचा असल्याने तक्रार करण्याची सोयसुद्धा नाही. काळा पैसा कसा बाहेर आणायचा, याची चिंता एकीकडे सरकार वाहत असताना तो फिरवून आणखी कसा पैसा उभा करायचा, हेच या प्रकरणाने दाखवून दिले आहे. आर्थिक फसवणुकीची प्रकरणे व नागपूरचा संबंध अतिशय जुना आहे. समीर जोशी, वासनकर यांची फसवणूक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतानाच आता हा नवा डब्बा समोर आल्याने हे शहर आणखी एका घोटाळ्यासाठी चर्चेत आले आहे. गोंदियासारख्या लहान शहरातून आलेला रवी अग्रवाल या प्रकरणातील मुख्य आरोपी. सध्या फरार असलेल्या या आरोपीच्या बुद्धिमत्तेला दादच द्यायला हवी, असे खुद्द पोलीसच आता सांगतात. अवघ्या सात वर्षांत त्याने अडीच हजार कोटींची उलाढाल या डब्ब्यातून केली. जुगार खेळायचा असेल तर केवळ क्रिकेटची गरज नाही. अधिकृत यंत्रणेतील अनेक गोष्टी त्यासाठी पुरेशा आहेत, हे या डब्ब्याने दाखवून दिले आहे. शेअर बाजारात चालणारा आकडय़ांचा अधिकृत खेळ एकीकडे व त्याच आकडय़ांचा आधार घेत अनधिकृतपणे चालणारा हा डब्बा दुसरीकडे, हे या ट्रेडिंगने स्पष्ट केलेच आहे. शिवाय, कोणत्याही कायदेशीर व्यवस्थेची भक्कम तटबंदी आम्ही तोडू शकतो, असा संदेशही यात सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांनी साऱ्यांना दिला आहे.