आता खऱ्या राजकारणास सुरुवात झाली आहे. केवळ भरघोस मतदान, आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात गाजलेल्या निवडणुका म्हणजे राजकारण नसते. निवडणुका होईपर्यंत हे सारे चालत असले तरी मतदान जवळ येऊ  लागले की खरा आखाडा सुरू होतो आणि कसलेले गडी मैदानात उतरतात. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि रामजन्मभूमी आंदोलनातील एके काळचे हुकमाचे पान असलेल्या केंद्रीय मंत्री उमा भारती या राजकारणाच्या रिकाम्या आखाडय़ात उतरण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. तसे संकेत त्यांच्या निवडणूक संन्यासाच्या घोषणेवरून मिळू लागले आहेत. मध्य प्रदेशासारख्या महत्त्वाच्या राज्यात उमा भारतींनी भाजपचे रोपटे रुजविले, त्याला खतपाणी घातले आणि त्याची पाळेमुळे घट्ट रुजल्यावर आता शिवराजसिंग चौहान त्या सत्तावृक्षाची फळे चाखत आहेत, ही काही नवी बातमी नाही. २००३ मध्ये उमा भारतींचा मध्य प्रदेशाच्या सत्ताकारणात शिरकाव झाला, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अभूतपूर्व यश मिळाले, पण त्यांच्या मस्तकावरील सत्तेचा शिरपेच फार काळ टिकलाच नाही. कर्नाटकातील दंगलप्रकरणीच्या फौजदारी गुन्ह्यवरून उमा भारती पायउतार झाल्या. आपण खेचून आणलेल्या विजयश्रीकडे असे दूरवरून पाहणे कोणाही राजकारण्यास किती वेदनादायक असू शकते, त्याची कल्पना करणेही कठीण. तेव्हापासून उमा भारती बहुधा या वेदनेची सल घेऊनच मध्य प्रदेशातील भाजपच्या सत्तेकडे पाहत असाव्यात. त्यांनी यश मिळविले आणि सत्तेचा शिरपेच मात्र शिवराजसिंह चौहान यांच्या माथी विराजमान झाला. आता त्यांच्यासाठी प्रचार करण्याची वेळ आल्यावर  सत्तेच्या या शिल्पकाराची दुखरी नस अधिकच ठसठसत असेल, तर ते साहजिकच नव्हे का?.. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड हा आजही उमा भारतींचा बालेकिल्ला मानला जातो. मग पक्षाला उमा भारती यांची आठवण झाली. शिवराजसिंहांनी त्यांना साद घातली, आणि त्याला प्रतिसाद देत उमा भारतींनी  धाव घेतली. आपण मध्य प्रदेशात प्रचारासाठी येण्याने खरोखरीच काही फरक पडणार आहे का, असे त्यांनी शिवराजसिंहांना विचारले, आणि शिवराजसिंहांनी तशी ग्वाही देताच त्या धावून आल्या. अलीकडच्याच एका जाहीर सभेत त्यांच्या दुखऱ्या नसांमधून ती वेदना उमटली. मध्य प्रदेशाच्या सत्तेकडे उमा भारती लांबून पाहत असल्या, तरी त्यांचे मन तेथे घुटमळत असावे. आजही मध्य प्रदेशाला आपली गरज आहे, हेच दाखवून देण्याची हीच वेळ आहे, हे त्यांनी ओळखले असावे. म्हणूनच उमा भारतींनी बुंदेलखंडात प्रचाराचा झंझावात उभा केला. सत्ताकारणातील संन्याशालाही स्वप्ने असतातच. उद्या जर भाजपला या राज्यात यश मिळाले, तर यशाच्या शिल्पकारांच्या यादीत उमा भारती हे नाव वरच्या क्रमांकावर असेल, आणि रामजन्मभूमीसाठी केलेल्या संघर्षांची पुण्याई पदरात पडणार असेल, तर अकाली हिरावला गेलेला सत्तेचा तो शिरपेच पुन्हा मस्तकी धारण करता येईल, असे स्वप्न कदाचित उमा भारतींना पडले असावे. दीड वर्षांसाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून अल्पसंन्यास घेऊन या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याची त्यांची इच्छा असेल, तर?.. कारण, राजकारणात सारे माफ असतेच!