वाचकहो, कोणताही मीडिया तुम्हाला हे सांगणार नाही, कोणताही पेपर हे छापणार नाही, पण आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.. काय म्हणालात? च्यानेलात नाही आले, पेपरात नाही दिसले, मग आम्हांस ते कुठून समजले? आम्हांला ते थेट पीएमओमधून समजले, ब्रह्मदेवाने आमच्या कानात येऊन सांगितले.. तुम्हाला काय करायच्यात फालतू चौकशा? पण विचारलेच आहे, तर सांगतो. आम्हास हे सारे समजते, कारण आम्ही पदवीधर आहोत व्हाटस्याप विद्यापीठाचे. आणि व्हाटस्यापवर जे येते ते त्रिकालाबाधित सत्यच असते. असो. तर सांगायची गोष्ट अशी की, सध्या पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबद्दल जो काही प्रचार सुरू आहे तो निव्वळ खोटा आहे. भाववाढ झाली. नाही असे नाही. पण ती का झाली? भाववाढ कमी झाली. बक्कळ एक पैशाने झाली, मग सात पैशाने झाली. पण ती का झाली? याबद्दल वाचकहो, तुम्ही सारेच अज्ञान अंधकारात आहात. शिवाय तुम्हाला देशाच्या मानमर्यादेचीही फिकीर नसल्यामुळे तुम्ही एक पैसा दरकपातीची खिल्ली उडवत आहात. हा का विनोदाचा विषय आहे? आज एका पैशाला फुटक्या कवडीइतकीही किंमत नाही असे म्हणत जेवढे म्हणून टवाळ लोक विनोद पसरवत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो, की जा, माझ्या या देशातील कोणत्याही गरिबाला जाऊन विचारा त्या एका कवडीची किंमत. तो हेच म्हणेल, की ‘एक फुटकी कवडी की किमत तुम क्या जानो राहुलबाबू? देशाचा अभिमान असतो एक पैसा. अर्थव्यवस्थेची शान असतो एक पैसा.’ लिटरमागे एक पैसा वाचणे म्हणजे किती मोठी बाब आहे? रोज एक पैसा वाचला तरी वर्षांला तुमची ३६.५० रुपयांची बचत होते. पण आम्ही तर म्हणतो, पेट्रोलचे दर कमी होताच कामा नयेत. कारण याच पैशांतून देशाचा विकास साधला जाणार आहे. जनधन अकाऊंटात पैसे जमा होणार आहेत. हे सारे गोरगरिबांसाठीच चालले आहे. पण काही नतद्रष्टांना हे पाहावत नाही. ते इंधनतेलाच्या भाववाढीवरून बोंबा ठोकतात सरकारविरोधी. पूर्वी नव्हती का भाववाढ? पण तेव्हा ती अयोग्य होती. आता आहे तिच्यामागे पाच देशप्रेमी जेन्युइन कारणे आहेत. ती अशी – (१) मागच्या सरकारने खूप कर्ज करून ठेवले. त्याचे ईएमआय भरण्यासाठी भाववाढ करावी लागली. (२) मागच्या सरकारपेक्षा ही भाववाढ खूप सुसह्य़ आहे. (३) आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची अभूतपूर्व टंचाई आहे. (४) देशातील रस्ते वाढलेत. त्यामुळे लोक खूप प्रवास करतात. त्यामुळे इंधनतेल खूप खपते. म्हणून त्याचे भाव वाढले. (५) भाव वाढले की इंधनतेल वापरणे कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते व परकी राष्ट्रांवरील आपले अवलंबित्व कमी होते या राष्ट्रवादी विचारातून मुद्दाम भाववाढ करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे या देशातील राष्ट्रवादी जनतेने हे सरकार स्वस्ताईसाठी मुळात निवडूनच दिले नव्हते. महागाई, पेट्रोल-गॅसभाववाढ याविरोधात पूर्वी भाजपने आंदोलने केली असली, तरी खऱ्या राष्ट्रवादी लोकांना स्वस्ताई नकोच होती. ज्यांना स्वस्ताई हवी असते त्यांना अर्थकारण कळत नसते. ते समजून घ्यायचे असेल, तर व्हाटस्याप विद्यापीठातच यावे लागेल. तेव्हा लोकहो, हे षड्यंत्र समजून घ्या. आणि खरा विकास हवा असेल, तर ही ‘तेल मोल की बात’ दहा लोकांना पाठवा..