तसे आम्ही प्रचंड धीट. पहिल्यापासूनच. आख्ख्या जगाला तो करोना किती महिने घाबरवतोय. पण आम्ही नाही घाबरलो. बातच नाही. फ्लूच्या हंगामामध्ये आलेला हा आणखी एक फ्लूच हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. पण तिकडं चीनमध्ये त्यालोकांनी काहीतरी प्रयोगशाळेत चावटपणा केला आणि फ्लूचा नवाच विषाणू जगभर सोडून दिला. त्यांचा खरा राग आमच्यावरच. म्हणूनच बघा ना, सध्या सर्वाधिक करोनावाले सापडतात कुठे? तर अमेरिका, ब्राझील आणि भारतात. म्हणजे आमच्याच परममित्रांच्या देशात. आमचा जाईर बिचारा स्वत:च बाधित झाला. पण आम्ही सांगितलेली दवा घेतो. हायड्रॉक्सी क्लोरोक्विन. त्यामुळे लवकर बरा होणार म्हणजे होणारच. आमचे आणखी एक मित्र  दिल्लीतले, त्यांच्याकडे तर हवं तेवढं हायड्रॉक्सी क्लोरोक्विन.. त्यामुळे तेही ठणठणीत आहेत. शिवाय आमचं न ऐकता पहिल्यापासून मफलरचा मास्क वापरतायत. त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. चिनी विषाणू आणि चिनी सैनिकांचे. पण आपण सांगून ठेवलंय.. काही लागली मदत तर खुशाल विचार.. आपण मदत देणार. चिन्यांविरुद्ध जे लढतील त्यांना मदत देणार.

हा सगळा चिन्यांचा कटच. आमच्या देशातले डेमोक्रॅट्स चिन्यांनी विकत घेतलेत. त्या बोल्टनला त्यांनीच भुलवलंय. काय त्याची लायकी होती? कुठे जम बसेना, म्हणून म्हटलं हरकत नाही. ये आमच्याकडे सल्लागार म्हणून. राहाय-जेवायची सोय करतो. तर पठ्ठय़ाने नको नको ते लिहायला घेतलं. आणि आमच्या घरातली ती कालची पोर, मेरी ट्रम्प. काहीही लिहिते. तिच्या प्रकाशकांनासुद्धा चिन्यांनी पैसा दिला असावा, यासाठी चौकशी करायचा आमचा विचार आहे. अमेरिकेत आमच्या विरुद्ध डेमोकॅट्र्स उभे आहेत नि अमेरिकेबाहेर चिनी. दोघांची मिलीभगत आहे. पण आम्ही हार मानणार नाही. आमच्या मतदारांकडे घरटी एक बंदूक आहे लक्षात ठेवा! आमच्या पोलिसांच्या मदतीला आता आमचे सैनिकही येऊ घातलेत.. अफगाणिस्तानातून आणि सीरियातून. इराणसमोर बिबी, चिन्यांसमोर मोदी.. शिवाय बोरिस आणि जाईर. चीनमध्ये क्षी असो, नाहीतर इराणमध्ये तो खामेनी किंवा इकडे व्हेनेझुएलात मदुरो.. आमच्या नावानं सगळे चळाचळा कापतात लक्षात ठेवा.

व्लादिमीर पुतिन आणि क्षी खरंतर आमचे जुने मित्र. हल्ली काय झालंय त्यांना कुणास ठाऊक. व्लादी तर २०१६ मधला हिशेब अजूनही मागतोय. अरे खंडणी मागतोस काय? तेही सर्वशक्तिमान अमेरिकेच्या अध्यक्षाकडे? क्षीला म्हटलं आमच्याकडचा सोयाबिन आणि मका घे, तर लबाडानं विषाणू पाठवून दिला न् आता म्हणतो व्यापार-व्यापार खेळू! आपण कोणाला भीक घालत नाही. अमेरिकेला पुन्हा महान बनवणार म्हणजे बनवणारच. अमेरिका अमेरिकनांसाठी आहे. अमेरिकेत अमेरिकनच राहणार. अमेरिकन अमेरिकेतच राहणार. आम्ही या महान देशातून करोनाला हाकलणारच. हायड्रॉक्सी क्लोरोक्विन असो की रेमडेसिविर.. गेलाबाजार डेटॉल नाहीतर लायझॉल. काय म्हणता, मास्कही वापरावे लागतील? तरी आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो! आणा रे तो मास्क. पण काळ्या रंगाचा हां.. नाहीतर म्हणतील.. मास्कसुद्धा काळ्या रंगाचा वापरत नाही म्हणून!