विस्कटलेले केस, चेहऱ्यावरला मेकअप ओला झाल्याने उडालेला रंग यांसह पूर्ण कपडय़ांतली मयांती लँगर अश्रू ढाळत होती, तर तिचा क्रिकेटपटू पती स्टुअर्ट बिन्नी तिला धीर देत रुमाल घेऊन मागे बसला होता. दुसऱ्या चौकोनात गावस्कर खुशीत  गात होते, ‘‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं..’’ – हा तर ‘झूम’चा  पडदा.. संजय मांजरेकर, वीरेंद्र सेहवाग, जतीन सप्रू, अजय जडेजा, हर्षां भोगले, दीप दासगुप्ता, गौरव कपूर, समीर कोचर, आकाश चोप्रा हेही बाकीच्या चौकोनांत दिसताहेत! समालोचकांची तातडीची बैठक सुरू आहे वाटते.. मग या ‘आसू आणि हसू’चे कारणही स्पष्टच आहे: ‘बीसीसीआय’ने संयुक्त अरब अमिरातीत ‘आयपीएल’चा घाट घातल्यावर जिवाची दुबई करण्याच्या इराद्याने फुललेले चेहरे, यंदा ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरूनच समालोचन करावे लागणार असल्याची कल्पना आल्यावर कोमेजणारच! भारतापेक्षा अधिक काळ अमिरातीतच असणाऱ्या गावस्करांनाच फक्त काय तो आनंद.  जतीनचा आवाज कावलेलाच होता- ‘‘याला काय अर्थ आहे? मी पहिल्यांदाच दुबईत जाणार होतो. बुर्ज खलिफा, दुबई म्युझियम अशा अनेक पर्यटनस्थळांची मी यादी केली होती. पण..’’ हे ऐकताच मयांतीनं आणखी एक हुंदका दिला. ‘‘बुर्ज खलिफाच्या सर्वात वरच्या मजल्यावर समूह-सेल्फी पोस्ट करता आला असता.. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमधून मी कित्ती ड्रेसेस खरेदी करणार होते!’’ एका चौकोनातून दीप दासगुप्तानंही बोलायला सुरुवात केली. ‘‘यार डेझर्ट सफारी के प्लान की धज्जियाँ उडा डाली.’’ हर्षां भोगलेंनी अभ्यासू मत मांडले, ‘‘टीव्हीवर ‘क्रिकेट लाइव्ह’मधला जिवंतपणाच संपणार.’’ इथं गावस्करांना वेळीच लक्षात आलं की, आपला आनंद व्यक्त करणं अयोग्य ठरेल. मग त्यानं नव्या गाण्याचा ठेका घेतला. ‘‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला.. करोनाच्या साथीमुळे यंदा तुम्हाला समालोचन प्रत्यक्ष मैदानाच्या साक्षीनं करता येणार नाही. पण निराश नका होऊ.’’ यावर स्टुअर्टकडे पाहात पुन्हा मयांतीनं गळा काढला- ‘‘घरीच ४६ दिवस काढायचे म्हणजे यूटय़ूबवर पाहून स्वयंपाकाचे प्रयोगही करावे लागणार..’’- ती पुटपुटली. आता जडेजानंही आपलं मत मांडलं, ‘‘हे काय मजा नाय. समालोचन वगैरे ठीक आहे. पण पाटर्य़ा वगैरे काहीच नाही?’’ बराच वेळ शांत असलेला सेहवाग यावर वाघासारखा बोलायला सरसावला, ‘‘करोना नामका यह डेंजर बॉलर है, कम से कम उसको तो डरोना. १२ मार्च को हिमाचल प्रदेश में साऊथ आफ्रिका के साथ होनेवाला मॅच कॅन्सल करने की नौबत आयी थी. तबसे यहीं पनवती लगी है. आयपीएल में मार्टिन गप्टिल जो की ‘इल’ है-  मतलब बिमार है- वो भी नहीं खेलेंगे, तो हम क्यूं?’’ गावस्करांनी आता अनुभवाचे बोल सुरू केले. ‘‘मित्रांनो मार्केट डाऊन आहे. नोकऱ्या कपात, पगार कपात, हेच सर्वत्र सुरू आहे. घरून समालोचन असले तरी काय झाले, मानधन मिळणार आहे ना?’’ मांजरेकरने गावस्करांची री ओढली, ‘‘सन्नीकाका बरोबर म्हणतायत. चिअरलीडर्सचं तर मागच्या वर्षीचं फुटेज स्क्रीनवर दाखवणार आहेत. आपल्याला किमान घरून  का होईना.. आपलं काम तरी चालू राहील!’’