‘थाड.. थाड’ असा आवाज कानाजवळ झाल्याबरोबर साखरझोपेत असलेले दादा ताडकन् उठून बसले. गालावरच्या तीव्र वेदना सहन करत त्यांनी आधी डोक्यावरून हात फिरवला. तेलाने चोपडलेल्या केसाचा व्यवस्थित पाडलेला भांग जसाच्या तसा आहे हे बघून त्यांना हायसे वाटले. काहीही झाले तरी खऱ्या स्वयंसेवकाची निशाणी पुसली जायला नको हा शाखेतला संदेश त्यांना त्याही स्थितीत आठवला. मग त्यांनी डोळे किलकिले करून समोर बघितले तर पलंगाच्या शेजारीच दातओठ खात उभे असलेले नाथाभाऊ दिसले. ते दिसताच आपण पत्रपरिषदेत काय बोललो याची आठवण दादांना झाली. पाहिजे तर बंद खोलीत येऊन थोबाडीत मारा, पण टीव्हीच्या दांडक्यांसमोर बोलू नका असे आपण म्हणालो आणि नेमके तेच नाथाभाऊंनी लक्षात ठेवत हे कृत्य केले. भाऊ अजूनही रागात आहेत हे लक्षात आल्यावर दादांनी पुन्हा गाल समोर केला, पण फुरंगटलेले नाथाभाऊ दोनच मारायच्या म्हणाला होतात, असे पुटपुटत शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसले. काही क्षण शांततेत गेल्यावर नाथाभाऊंचा आवाज घुमू लागला. ‘का.. का तुम्ही छळता मला. दोनदा उमेदवारी नाकारली. केंद्रीय कार्यकारिणीत घेण्याची नुसती लालूच दाखवली. एवढा अन्याय होऊनही मी बोलायचेच नाही? दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारही करायचा नाही ? तुमच्यावर टीका करायची नाही? केळी पिकवत असलो तरी ती खाणारा मी नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही तर पैलवानांच्या प्रदेशातले. का त्या नागपूरवाल्यांच्या नादी लागता? का त्याची तळी उचलता? भाईंशी असलेल्या थेट संबंधाचा फायदा घेत स्वतंत्रपणे विचार करा ना जरा! ओबीसींच्या राज्यात ओबीसींवर अन्याय हे तुम्हाला तरी पटते का? तुम्ही भल्या पहाटे घडय़ाळ बांधले तर चालते, पण मी मात्र तसे करायचे नाही. हा दुटप्पीपणा नाही का? एकीकडे मुस्कटदाबी करायची व दुसरीकडे गप बसायला सांगायचे हे किती काळ सहन करायचे? तुम्ही तरी त्या अहंकारीभाऊंच्या नादाला लागून इतके कणाहीन का होता? जा सांगा ना दिल्लीत जाऊन, इथे असंतोष आहे म्हणून. तुम्हीच दिले होते ना मला आश्वासन, केंद्रीय चमूत घेतो म्हणून. त्याचे काय झाले? का असे फसवता?’ नाथाभाऊंच्या प्रश्नांच्या फैरीत दादांच्या गालावरचे दु:ख कुठल्या कुठे पळून गेले. ‘अहो, मी राज्याचा प्रमुख आहे. पक्षाची बाजू मला मांडावीच लागणार. त्या नागपूरवाल्यावर दिल्लीत दोघांचाही कमालीचा विश्वास आहे. हे तुम्हाला कळत असूनही तुम्ही का त्यांना सारखे सारखे डिवचता? त्यांच्याशी जुळवून घ्या ना! त्यातच तुमचे हित आहे. एक दिवस हे भाऊ दिल्लीला गेले की मग आपलेच राज्य आहे हे तुमच्या लक्षात कसे येत नाही? तुम्ही ‘तोडपाणी’ न करता पक्षासाठी खस्ता खाल्ल्यात हे ठाऊक आहे सर्वाना. म्हणूनच सारे तुम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. उगीच त्या घडय़ाळाच्या नादी लागू नका. किमान काही दिवस तरी शांत बसा. ’ दादांचे बोलणे संपायच्या आतच नाथाभाऊ ताडकन् उठून बाहेर पडले.

..दोनेक तासांनी दादांना जाग आल्यावर, स्वप्न आठवून दादा हसले. न्हाणीघरातल्या आरशात त्यांनी चेहरा बघितला तर गालावर वळ नव्हतेच. तेवढय़ात त्यांना श्रेष्ठींचा संदेश आठवला. राजकारणासंबंधी मनात आलेले विचार- पडलेले स्वप्नही- कसलाही वेळ न दवडता दिल्लीला सांगायचे. अशा गोष्टी डावपेच रचण्यासाठी उपयुक्त ठरतात म्हणे! त्यांनी लगेच फोन हाती घेतला.