प्राचार्याच्या कक्षातून वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश असलेल्या कागदाची जंत्री घेऊन ते बाहेर पडले तेव्हापासून वेगळ्या प्रकारची अस्वस्थता त्यांच्या मनी दाटून आली होती. गेल्या २० वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी शिकवत होते, पण अशी वेळ येईल हे त्यांना कधी वाटले नाही. स्थापत्यकलेचे आविष्कार असलेले खजुराहो, वेरुळ लेणी, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, ताजमहाल कुठे व हा बोगदा कुठे? पण काय करणार आले नेत्याच्या मना, त्यासमोर कुणाचे चालेना! आणि त्यातही या सहलीचे चित्रीकरण होणार म्हणे. करणार कोण तर पक्षाच्या चाणक्य मंडळाचा एक कार्यकर्ता. त्याचा खर्च विद्यार्थ्यांच्या बोकांडी! हे ‘टू मच’ होतेय असा विचार मनात येताच त्यांनी जीभ चावली. खरे तर दिल्लीतून आलेल्या त्या सूचना वाचून त्यांना हसू आले होते. ‘काय हे’ म्हणून विद्यार्थीही खिदळतील याची त्यांना खात्री होती, पण ‘शूट’ होणार म्हटल्यावर सरकारी सभ्यतेने वागणे आलेच. वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना सहलीची कल्पना दिल्याबरोबर अनेकांनी नाके मुरडली. काहींनी जगभरातील बोगद्यांची इत्थंभूत माहिती सांगायला सुरुवात केली. प्रात्यक्षिक गुणांचा धाक दाखवत त्यांनी साऱ्यांना शांत केले. आधीच्या सहली किती हसतखेळत व्हायच्या. खरे शिक्षण त्यातून मिळते, मात्र हे वरच्यांना कोण सांगणार? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे असा विचार करत ते वर्गाबाहेर पडले.

सहलीचा दिवस उजाडला. मजल, दरमजल करीत ते सारे मनालीला पोहोचले. तिथून दुसऱ्या दिवशी बोगद्याचे प्रवेशद्वार गाठले. आत जाण्याआधी त्यांनी मार्गदर्शक सूचनांचा कागद बाहेर काढला. म्हणाले, ‘‘हे बघा ही उद्घाटनाच्या कार्यक्रमाची शिळा आहे. याचे वाचन करणे सक्तीचे आहे. बोगद्याच्या मध्ये कुठे तरी तुम्हाला शिलान्यासाची शिळा दिसेल. त्यावर देशद्रोही विरोधकांची नावे असल्याने ते वाचण्याचा प्रयत्न करू नका. तसाही तो भाग इतिहास पुनर्लेखन कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून तेथे काटेरी कुंपण लावण्यात आले आहे. बोगद्याच्या मध्ये गेल्यावर एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला टाळी वाजवायची आहे. ती वाजवताच टाळीचा प्रतिध्वनी न येता आपल्या लोकप्रिय नेत्याचे नाव तुम्हाला ऐकू येईल. आतला प्रवास सुरू असताना कुणीही वाहनातील आसनावर उभे राहून हात हलवण्याचा प्रयत्न करू नये. तो अधिकार फक्त नेतृत्वाला आहे. या सूचनांवर कुणीही प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारण्याची सवय आपल्याला हळूहळू मोडायची आहे.’’ या कथनानंतर नि:शब्द प्रवास सुरू झाला. टाळीचे ठिकाण आले. एकाने ती वाजवताच प्रतिध्वनीतून नेत्याचे नाव ऐकू आले. दुसऱ्याने दोनदा वाजवल्याबरोबर ‘मनमोहन’ असा आवाज आला. तो ऐकताच प्राध्यापकांना घाम फुटला. मग तिसऱ्याने वाजवली तेव्हा ‘सोनिया’ ऐकू आले. आपण प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळ तर नाही ना, अशी शंका चाणक्य-कार्यकर्त्यांला आली. तेवढय़ात चौथ्याने वाजवली तेव्हा ‘नितीनभाऊ’ असा आवाज आला. विरोधकांनी या तंत्रज्ञानातही घुसखोरी करून, नेतृत्वाला डिवचण्यासाठीच नितीनजींचे नाव घेतले की काय? नक्कीच यामागे पाकिस्तानचा हात असावा अशी नोंद कार्यकर्त्यांने घेतली. काही तरी बिनसते आहे हे लक्षात येताच सारे वेगाने बोगदा पार करू लागले. बाहेर येताच सुटकेचा नि:श्वास टाकत विद्यार्थ्यांनी विचारले, ‘‘आता कुठे?’’ यावर, ‘‘आता नर्मदेच्या तीरी.. पुतळ्याकडे,’’ असे म्हणत त्यांनी घाम पुसला.