‘कट’ असा आवाज येताच ती बोलायचे थांबली. कॅमेऱ्यामागच्या माणसाने समोर येऊन, झालेली चूक तिच्या लक्षात आणून दिली. दिल्लीच्या मुख्यालयातून आलेल्या मजकुरात मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ काश्मीरशी करण्याचा उल्लेख असताना तिने चुकून ‘भारतव्याप्त’ म्हटले. जे ट्वीट केले तेच बोलायचे आहे कारण हा व्हिडीओ बिहारमध्ये गावागावांत दाखवला जाणार आहे हे लक्षात आणून दिल्यावर तिने पुन्हा चूक केली नाही. शूट पूर्ण होताच तिला थकल्यासारखे झाले. हा नवा जॉब पाहिजे तेवढा सोपा नाही याची जाणीव तिला झाली. तेवढय़ात तिचा सहायक व रंगभूषाकार आले. ‘केंद्राचे सुरक्षा जवान तैनात झाले आहेत. अशी सुरक्षा मिळणाऱ्या देशातील सोळाव्या व्यक्ती तुम्ही आहात,’ असे सहायकाने सांगताच तिचा चेहरा फुलला. कितीही हिट सिनेमे दिले असते तरी अशी सुरक्षा जन्मात मिळाली नसती. शिवाय चौफेर प्रसिद्धी वेगळीच! आता काही जण ‘कंगना ही राखी सावंतची धाकटी बहीण’ म्हणून हिणवू लागले आहेत. पण राखीसारखी वायफळ बडबड मी करत नाही. सारे काही दिल्लीच्या इशाऱ्यावर करते असा विचार मनात येताच ती सुखावली. सेनेवर बोचरी टीका करताना केसाची मोकळी सोडलेली एक बट जर ओठाने उडवली तर ते अधिक परिणामकारक ठरेल असे रंगभूषाकाराने लक्षात आणून दिल्यावर पुन्हा चित्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला. हे काम अभिनयापेक्षा कठीण आहे. शिवाय जोखीमही भरपूर. त्यामुळे मुख्यालयाने केवळ सुरक्षेचा विचार न करता कलावंत म्हणून खासदारकीसुद्धा द्यायला हवी, असा मनात आलेला विचार तिने सहायकाजवळ बोलून दाखवला. त्यावर मंद हसत त्याने दिल्लीहून आलेला नवा मजकूर तिला दाखवला. त्यात विमानतळावर उतरल्यावर काय बोलायचे, नंतर मुंबईच्या घरी पोहोचल्यावर पुढचे तीन दिवस काय ट्वीट करायचे हे सविस्तर नोंदवले होते. कागद हाती पडताच तिने पाठांतराला सुरुवात केली. दिलेल्या मजकुरातील एकही शब्द इकडेतिकडे व्हायला नको अशी मुख्यालयाने दिलेली ताकीद तिला आठवली. मजकुरातील दोन मराठी वाक्ये तिने लगेच सहायकाकडून रोमन लिपीत करून घेतली. मराठी विरुद्ध बिहारी हेच येत्या नोव्हेंबरमधील यशाचे गमक आहे याची जाणीव सहायकाने तिला करून दिली व राणी लक्ष्मीबाईच्या मराठी वंशजांची सविस्तर माहिती असलेले दुसऱ्या बाजीरावांच्या कार्यकाळावरील एक पुस्तकही तिच्या हाती सोपवले. राणीचे नाव ऐकताच कंगनाच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. विमानाने जाण्याऐवजी घोडय़ावर बसून मुंबईला गेलो तर.. असा विचार मनात येताच तिने तो सहायकाला बोलून दाखवला. सुरक्षेच्या कारणासाठी ते शक्य नाही असे सहायकाने सांगताच तिने पुस्तकात डोके खुपसले. मॅडम हिरमुसल्या हे लक्षात आल्यावर पुढचे तीन दिवस वक्तव्यांनी गदारोळ उडाला तर मुख्यालयाकडून झेड दर्जाची सुरक्षाही मिळेल, असे सहायकाने सांगताच तिचा चेहरा खुलला. मुंबईत आपल्याला सर्वात आधी आधार देणाऱ्या पण या नव्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या भट कँपला ही बातमी सांगायला हवी हे लक्षात येताच तिने थेट महेशदांना फोन लावला. हिटलरच्या छळकथा वाचण्यात व्यस्त असलेल्या भटांनी फोन घेतला व कंगनाचे तारस्वरातील बोल ऐकून काही न बोलताच ठेवून दिला.

तेवढय़ात पुन्हा तिच्याकडे आलेल्या सहायकाने ‘मॅडम, तुमच्यावर हक्कभंग दाखल होणार’ असे सांगताच तिचा चेहरा प्रश्नार्थक झाला. हा पुरस्कार आहे का, हे दिल्लीला विचारा असे तिने सहायकाला बजावले. मुख्यालयाने तातडीने दखल घेत हा पुरस्कारच समजा असा निरोप देताच तिला हर्षवायू झाला!