चंद्रकांत पाटील या नावाच्या व्यक्तींसाठी सध्या सुवर्णसंधी चालून आली आहे. या व्यक्तींना राजकारणात नशीब आजमावयाचे असेल व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल तर महाराष्ट्र व गुजरात सोडून इतर प्रदेशांत त्यांनी काम सुरू केले, तर भाजपकडून त्यांना थेट प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. या पक्षाच्या राशीला सध्या हे नाव खूपच अनुकूल आहे असे म्हणतात. त्यामुळे एकाच नावाचे दोन प्रदेशाध्यक्ष नेमले गेले. त्यातले महाराष्ट्रातले दादा अमित शहांच्या जवळचे तर गुजरातचे चंद्रकांतजी मोदींच्या. तिकडे दिल्लीत शहा मोदींच्या जवळचे. त्यामुळे ट्रान्झिटिव्हिटीचा गणितीय सिद्धांतसुद्धा पूर्ण होतो. राज्याच्या सीमेला लागून असलेल्या नवसारीचे खासदार असलेल्या सुरतच्या चंदूभाईंनी तिकडेही मराठीचा झेंडा फडकत ठेवलाच आहे. मराठी पाटील, महाराष्ट्र संवर्धन यासारख्या अनेक संस्थांचे अध्यक्ष ते आहेत. त्यामुळे आता गुजरातींनी मराठी भाषकांवर अन्याय केला अशी साठ वर्षांपासून सुरू असलेली ओरड बंद करायला हवी. मराठी माणसाने गुजरात भाजपचा ताबा घेतला असे अभिमानाने सांगायला हवे. याच न्यायाने भाजपने उद्या महाराष्ट्राची धुरा गुजराती नेत्याकडे दिली तरी ओरडायचे काहीच कारण नाही. कारण तिथे आपले जळगावचे चंदूभाई आहेतच की! या नेमणुकीमुळे आता राज्याचे आर्थिक केंद्र अहमदाबादला पळवले, हक्काचे पाणी पळवले असा त्रागाही मराठीजनांना करता येणार नाही. शेवटी दोन्हीकडे सत्तेचे सुभेदार मराठीच ना! चंदूभाई आज जरी तिकडचे अध्यक्ष झाले असले तरी भविष्यात मुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात. मोदींच्या जवळचे हा निकष त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहेच. तसे झाले तर दोन राज्यांत मराठी मुख्यमंत्री होईल व भाषावार प्रांतरचना कशी चुकीची होती असे म्हणत नेहरूंवर आणखी एक आरोपपत्र ठेवता येईल. कैक वर्षांपासून गुजरात पॅटर्नची चर्चा देशभरात सुरू आहे. चंद्रकांतजींच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र पॅटर्न प्रथमच तिकडे राबवला गेला. यातून भाजपच्या लेखी मराठी माणसाला किती महत्त्व आहे हेच अधोरेखित होते. तसाही हा अख्खा परिवारच मराठी माणसांनी उभा केलाय म्हणा! गुजराती नेत्यांवर देश विकायला काढलाय वगैरे ऊठसूठ आरोप करणाऱ्या फुटकळ मराठी नेत्यांची तोंडेही पार बंद करून टाकेल, अशी ही नेमणूक. आता असा आरोप करायच्या आधी दहादा तिकडे बसलेल्या चंद्रकांतजींचा विचार करावा लागणार. बाकी कुणी काहीही म्हणो, आपले दादा मात्र या नियुक्तीने जाम खूश आहेत म्हणे! २४ तास संघटनात्मक काम करून कधी थकवा आलाच तर दिल्लीच्या अपरात्री येणाऱ्या फोनवर ‘अहो, मी तिथला  नाही, इथला’ असे सांगत दादांना वेळ मारून नेता येईल. तिकडचे भाई नवीन असल्याने सध्या तरी ते असे डावपेच वापरणार नाहीत, याची खात्री दादांनी बाळगावी! हे क्रॉस कनेक्शन सिद्ध करण्यासाठी दादांनी कधीचीच थोडीफार गुजराती भाषा शिकून घेतलीय म्हणे! शहांची सासुरवाडी शेजारी असण्याचा फायदा आता नाही तर कधी घ्यायचा असा साळसूद विचार दादांनी केला असेलच. नामसाधम्र्यामुळे जसे नुकसान होते तसे बरेचदा फायदाही होतो. अशा फायद्याची गणिते मांडायला दादांनी सुरुवात केली असेल तर तिकडे नुकसान मात्र सुरतच्या भाईंचे होणार हे ठरलेले. आणि हो, एक राहिलेच. आता दादांना ‘चंपा’ म्हणण्याची हिंमत कुणीच करणार नाही.. केली तर अपमान एकाचा नाही, दोघांचाही होणार आणि दुसरे तर थेट मोदींच्या मर्जीतले!