अखेर निवडणुकीच्या प्रक्रियेतील माध्यमांच्या भूमिकेचा दुसरा टप्पाही सोमवारी प्रथेनुसार पार पडला. जनतेचे ज्ञान अद्ययावत करणे ही माध्यमांची जबाबदारी, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत या जबाबदारीचा टप्पा माध्यमांना पार पाडावाच लागतो. दृक्श्राव्य माध्यमांना तर त्या क्षणाची बातमी त्याच क्षणाला द्यायची असते. त्यामुळे, मतदानोत्तर जनमत चाचण्या हा या जबाबदारीचा दुसरा टप्पा पार पाडून या माध्यमांनी सोमवारी ‘हुश्श’ म्हटले असेल. ‘पांढऱ्यावरच्या काळ्या’ची बात निराळी असते. एकदा पांढऱ्यावर काळे झाले, की ते पुसता येत नाही, आणि तेच बरेच दिवस टिकून राहते. दृक्श्राव्य माध्यमांवर अंतिम असे काही नसते. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या ‘अपडेट’मुळे, पडद्यावर उमटविलेले ‘पहिले काळे’ पुसणे तसे सोपेही असते. मतदानोत्तर चाचण्यांची आकडेवारी वर्तविल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात मतमोजणीचे निकाल हाती येतील, तेव्हा त्या नव्या आकडय़ांनिशी त्यांचे पडदे सजतील. हे लक्षात घेऊन मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे आडाखे आखताना काही पथ्ये पाळावी लागतात. पहिले पथ्य, म्हणजे, कोणत्या पक्षास किती जागा द्याव्यात हे ठरविताना, सर्व पक्षांच्या विजयी जागांची बेरीज त्या सभागृहातील सदस्यसंख्येहून जास्त होणार नाही याची काटेकोर काळजी घेणे. म्हणून एखाद्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या पारडय़ात मतदानोत्तर चाचणीचा निष्कर्ष म्हणून कितीही जागा ओतल्या, तरी उरलेल्या जागांची विभागणी अन्य पक्ष वा आघाडय़ांच्या पारडय़ात घालताना, मतदारांना अगदीच अविश्वसनीय वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अनेकदा असे होते की, ज्या पक्षाच्या पारडय़ात विजयी जागांची खैरात झालेली असते, त्यांना तो निष्कर्ष अपेक्षेप्रमाणेच असल्याची खात्रीच असते, आणि ज्यांच्या पदरात पराजय पडतो, त्यांना या चाचण्या अविश्वसनीय वाटत असतात. अर्थात, राजकीय पक्षांच्या या प्रतिक्रियांशी या अभ्यासास काहीच देणेघेणे नसते. मतदानोत्तर जनमत चाचण्या म्हणजे, कोणास काय वाटेल याचा विचार न करता वास्तवाशी थेट भिडणारा निष्कर्ष काढण्याची एक अवघड कसरत असते. अनेकदा त्यामध्ये तोंडावर आपटण्याची वेळ येते. यापूर्वी कधी कधी अशी वेळ आलेली  असल्याने, नव्या निवडणुकीनंतरच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष चुकू नयेत यासाठी काटेकोर काळजी घेणे गरजेचेच होते. सोमवारी जाहीर झालेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांची आकडेवारी अशीच खबरदारी घेणारी आहे. चाचणीचे निष्कर्ष कितीही चुकले, तरी, चित्र  पुरते उलटे होणार नाही याची खात्री देणारे  निष्कर्ष काढण्याची काळजी घेण्यास नैतिक निष्ठेचे अधिष्ठान  असले की झाले! तेवढे केले, की विरोधातील निष्कर्षांमुळे नाराज होणाऱ्यांचे नेमके म्हणणे काय, याची चिंता करण्याचे कारण राहत नाही. तेवढय़ा त्रयस्थपणे आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहणे आणि त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे आवश्यकच असते. आणखी दोन दिवसांनी, विधानसभा निवडणुकीची  मतमोजणी होईल, प्रत्यक्ष निकाल हाती  येतील. मतदानोत्तर जनमत चाचण्यांचा कौल आणि प्रत्यक्ष निकाल यांची तुलनाही होईल. पण प्रत्यक्ष निकालांच्या आकडेवारीमुळे या चाचण्यांचे आकडे पडद्यावरून पुसले गेलेले असतील. शेवटी, त्या त्या वेळी- त्या त्या क्षणी, ती-ती माहिती जनतेसमोर ठेवण्याचे कर्तव्य पार पडलेले असेलच ना!